Ganeshotsav Decorations Pudhari
पुणे

Pune Ganeshotsav Decorations: दीड दिवसांच्या विसर्जनानंतरच पुण्यात गणेश देखाव्यांना गर्दी; मध्यवस्तीत भक्तांचा जनसागर

दगडूशेठ, मंडई, बाबू गेनू, भाऊ रंगारी मंडळ परिसर फुलला; सोशल मीडियामुळे देखावे पाहण्याची उत्सुकता वाढली

पुढारी वृत्तसेवा

​पुणे: दीड दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी, म्हणजेच बुधवारी (दि. १६) सायंकाळी पुणे आणि परिसरातील नागरिकांनी मध्यवर्ती पुण्यातील गणेश देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी केली. एरवी पाचव्या किंवा सातव्या दिवसापासून देखावे पाहण्यासाठी गर्दी होते; मात्र यंदा दुसऱ्याच दिवशी पुणेकरांनी कुटुंबीयांसह मध्यवस्तीत मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यंदाच्या गणेशोत्सवात विविध मंडळांनी साकारलेले हलते देखावे, जीवंत देखावे, प्रसिद्ध मंदिरांच्या भव्य आणि हुबेहूब प्रतिकृती तसेच आकर्षक विद्युत रोषणाई पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आपल्या कुटुंबासह आणि चिमुकल्यांना सोबत घेऊन बाप्पाच्या दर्शनासाठी व देखावे अनुभवण्यासाठी मध्य पुण्यात दाखल झाले होते.

मध्यवस्तीतील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, अखिल मंडई मंडळाचा शारदा गजानन गणपती, हुतात्मा बाबू गेनू गणपती आणि भाऊ रंगारी गणपती या प्रमुख आणि मानाच्या गणपती मंडळांच्या परिसरात नागरिकांचा जनसागर उसळला होता. यासह परिसरातील इतर अनेक लहान-मोठ्या गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठीही भक्तांची अलोट गर्दी झाली होती. यंदा खास करून विविध मंडळांनी सादर केलेल्या ''जीवंत देखाव्यांना'' भाविकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

सोशल मीडियाचा प्रभाव अन् खाऊ गल्ल्यांमध्ये रेलचेल

​गेल्या वर्षी सात दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर मुख्य गर्दीला सुरुवात झाली होती. मात्र, यंदा सोशल मीडिया, विशेषतः इंस्टाग्रामच्या माध्यमातून गणेशभक्तांना घरबसल्या विविध देखाव्यांची माहिती, फोटो आणि रील्स पाहायला मिळाले. यामुळे उत्सुकता वाढल्याने नागरिकांनी थेट कामावरून सुटल्यानंतर किंवा कामातून वेळ काढत बुधवारी सायंकाळीच देखावे पाहण्यास पसंती दिली. देखावे पाहून झाल्यानंतर मध्यवर्ती भागातील आणि बाजारपेठेतील प्रसिद्ध खाऊ गल्ल्यांमध्येही पुणेकरांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उपहारगृहे आणि स्टॉल्सवर खवय्यांची तुफान गर्दी झाली होती. एकंदरीत, दीड दिवसाच्या विसर्जनानंतर लागलीच सुरू झालेल्या या गर्दीमुळे यंदाचा पुणे गणेशोत्सव सुरुवातीपासूनच मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.

सदाशिव पेठेत भक्ती अन् नाट्यकलेचा संगम

गणेशोत्सवाच्या निमित्ताने नवजवान मित्रमंडळ, ८२८ सदाशिव पेठ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ''श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा'' हा भव्य-दिव्य पौराणिक जीवंत देखावा सध्या पुणेकरांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. ​उत्कृष्ट प्रकाशयोजना, संवाद आणि कलाकारांच्या जीवंत अभिनयामुळे हा विवाह सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरत असून, तो पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत असल्याचे चित्र बुधवारी पाहायला मिळाले आहे, आगामी काही दिवसात येथील गर्दी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे येथे पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असल्याचे चित्र दिसले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT