Tree Cutting Pudhari
पुणे

Ganeshkhind Road Tree Cutting: गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीला अद्याप परवानगी नाही; आयुक्तांचा खुलासा

रस्तारुंदीकरणासाठी 529 वृक्ष तोडण्याच्या चर्चांदरम्यान महापालिका प्रशासनाची स्पष्ट भूमिका

पुढारी वृत्तसेवा

पुणे: गणेशखिंड रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड करण्या संदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नसून, त्याबाबत कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी बुधवारी स्पष्ट केले.

गणेशखिंड रस्तारुंदीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात अडथळा ठरणारे 529 वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पथ विभाग आणि घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाकडून तयार करण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावावर अद्याप सुनावणी झालेली नाही.

दरम्यान, शहरातील पर्यावरणप्रेमी नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि विविध संघटनांनी महाराष्ट्र दिनानिमित्त गणेशखिंड रस्त्यावर मानवी साखळी आंदोलन करीत वृक्षतोडीला विरोध दर्शविला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग््रेास (शरदचंद्र पवार गट) नेत्या व माजी खासदार वंदना चव्हाण यांनीही पत्रकार परिषदेत प्रशासनावर टीका केली होती.

या पार्श्वभूमीवर आयुक्त राम म्हणाले, “शहरात मेट्रो, नदीकाठ सुधारणा आणि रस्तारुंदीकरण अशा विविध प्रकल्पांमुळे सुमारे अडीच हजार वृक्ष बाधित होणार आहेत. त्यासंदर्भातील प्रस्ताव माझ्याकडे प्राप्त झाले आहेत. मात्र, गणेशखिंड रस्त्यावरील वृक्षतोडीचा प्रस्ताव अद्याप आलेला नाही. यासंदर्भात काही तक्रारी असल्यास त्यांची योग्य दखल घेतली जाईल.”

“वृक्षतोडीपूर्वी प्रस्ताव, त्यावर सुनावणी आणि त्यानंतर परवानगी ही प्रक्रिया अनिवार्य आहे. या सर्व टप्प्यांशिवाय वृक्षतोड होऊ शकत नाही. शहरातील पर्यावरण जपणे जितके महत्त्वाचे आहे, तितकीच विकासकामेही आवश्यक आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचा सखोल आढावा घेतला जाईल. वृक्षतोड अपरिहार्य असल्यासच ती केली जाईल. त्याचबरोबर बाधित वृक्षांचे पुनर्रोपण आणि नव्या वृक्षारोपणाला प्राधान्य दिले जाईल,” असेही आयुक्त म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT