पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटासमोर तीन ते चार तास थिरकणारी आजची तरुण पिढी भविष्यात गंभीर श्रवणदोषाला सामोरी जाऊ शकते. अतितीव्र आवाजामुळे कानातील श्रवणाशी संबंधित नसा हळूहळू कमकुवत होतात. त्याचे परिणाम लगेच जाणवत नसल्याने त्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, १५ ते २० वर्षांनंतर हीच पिढी चाळिशी-पंचेचाळिशीत पोहचेल तेव्हा मोठ्या प्रमाणावर 'हिअरिंग लॉस' अर्थात बहिरेपणाची समस्या समोर येण्याची भीती आहे. डीजेचा दणदणाट कानांसाठी 'सायलेंट किलर' ठरत असल्याचा इशारा कान-नाक-घसातज्ज्ञ डॉ. विनया चितळे यांनी 'पुढारी'शी बोलताना दिला.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या ध्वनिप्रदूषणाचा कानांवर नेमका काय परिणाम होतो, डीजेच्या आवाजात दीर्घकाळ राहणे किती धोकादायक आहे आणि त्यामुळे होणारा श्रवणदोष बरा होऊ शकतो का, याबाबत डॉ. चितळे यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, मोठ्या आवाजामुळे होणारे नुकसान हे तत्काळ लक्षात येत नाही, हीच सर्वांत गंभीर बाब आहे. कानातील नसा सातत्याने तीव्र आवाजाच्या संपर्कात आल्यास त्यांची क्षमता हळूहळू कमी होते. काही वर्षांनंतर संबंधित व्यक्तीला समोरच्याचे बोलणे स्पष्टपणे ऐकणे, समजून घेणे आणि त्याच्याशी सहज संवाद साधणे कठीण होऊ लागते.
सामान्यतः ६० ते ८५ डेसिबलपर्यंतचा आवाज संरक्षणात्मक साधनांशिवाय काही मर्यादेपर्यंत सहन करता येतो. मात्र, डीजेच्या आवाजाची पातळी अनेकदा १०० ते १२० डेसिबलपर्यंत पोहचते. गेल्या वर्षी गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सीओईपीने केलेल्या ध्वनिपातळीच्या मोजणीत शहरातील सरासरी आवाज १०१.५ डेसिबल नोंदविला गेला. डेक्कन येथील खंडोजीबाबा चौकात रात्री आठच्या सुमारास तब्बल १२९.८ डेसिबल इतकी उच्चपातळी नोंदविण्यात आली होती. ढोल-ताशांच्या आवाजाची पातळीही साधारण ८० ते ९० डेसिबलपर्यंत पोहचते.
मोठ्या आवाजाचा कानांनाच नव्हे, संपूर्ण शरीराला धोका
हृदय व चयापचयावर परिणाम
उच्च रक्तदाबाचा धोका
हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्याशी संबंधित हृदयरोगाचा धोका
हृदयविकाराच्या झटक्याची
शक्यता वाढणे
लठ्ठपणा आणि टाइप-२ मधुमेहाचा धोका
मेंदू, झोप आणि मानसिक
आरोग्यावर परिणाम
झोपेचे गंभीर विकार आणि
दीर्घकालीन थकवा
विचार व आकलनक्षमतेवर परिणाम
स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता
चिंता, नैराश्य आणि
चिडचिड वाढण्याचा धोका
दीर्घकालीन श्रवण व मानसिक त्रास
सतत कानात आवाज येणे (टिनिटस)
दीर्घकालीन श्रवणदोष
सातत्याने आवाजाच्या संपर्कामुळे
मानसिक तणाव
मुले, गर्भवती आणि ज्येष्ठांना अधिक धोका
मुलांच्या आकलनक्षमतेवर परिणाम
शैक्षणिक कामगिरी खालावण्याची शक्यता
गर्भवती महिलांमध्ये प्रतिकूल
प्रसूती परिणामांचा धोका
ज्येष्ठांमध्ये आकलन आणि
रणशक्तीतील घट वेगाने होण्याची शक्यता
मिरवणुकीत सोसावा लागतोय असह्य ताण
आवाज वाढव डीजेच्या भिंती, ढोल-ताशांचा दणदणाट, यासह अन्य वाद्यांमुळे लक्ष्मी रस्त्यावरील विसर्जन मार्गावरील दहा चौकांतील आवाजाची पातळी गेल्या काही वर्षांत ९० ते १०० डेसिबलदरम्यान असते. त्यामुळे गणपती विसर्जन मिरवणुकीत पुणेकरांना असह्य ताण सोसावा लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय प्रदूषण
मंडळाच्या निकषांनुसार दिवसा निवासी क्षेत्रात ५५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७५ डेसिबल, व्यापारी क्षेत्रात ६५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ५० डेसिबल, तर रात्रीच्या वेळी निवासी क्षेत्रात ४५ डेसिबल, औद्योगिक क्षेत्रात ७० डेसिबल, व्यापारी क्षेत्रात ५५ डेसिबल, तर शांतता क्षेत्रात ४० डेसिबल ध्वनिपातळी असणे अपेक्षित आहे. विसर्जन मिरवणुकीच्या उत्साहात या मर्यादा धुडकावल्या गेल्याचे ध्वनिप्रदूषणाच्या आकडेवारीवरून दरवर्षी दिसून येते.
गेल्या वर्षीची मिरवणूक मार्गावरील चौक ध्वनिपातळी (डेसिबलमध्ये)
(६ सप्टेंबर दुपारी १२ ते ७ सप्टेंबर सकाळी ८)
बेलबाग ९८.८
गणपती चौक ९२.७
लिंबराज ९३.४
कुंटे ९५.२
उंबऱ्या गणपती ९१.९
गोखले ९३.७
शेडगे विठोबा ९३.९
होळकर ९४.७
टिळक ८९.५
खंडूजीबाबा ८२.१
एकूण सरासरी ९२.६
उत्सव साजरा करणे हा आपला अधिकार आहे. परंतु, तो उत्सव साजरा करीत असताना त्याचा कोणताही त्रास दुसऱ्याला होणार नाही, याचे भान राखणे ही आपली प्रमुख जबाबदारी आहे. पुणेकर नागरिक सजग असल्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे. त्यामुळे समाजभान जपत उत्सव साजरे करण्याची गरज आहे. गणपती उत्सव किंवा अन्य कोणताही उत्सव असो, या उत्सवांदरम्यान एका ठरावीक मर्यादेतच आवाज ठेवला जावा; जेणेकरून उत्सव देखील साजरा करता येईल आणि सामान्य नागरिकांना देखील त्याचा होणार नाही, अशी समंजस भूमिका घेण्याची गरज आहे.डॉ. महेश शिंदीकर, वरिष्ठ प्राध्यापक, सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठ