Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune Ganesh Mandals Electricity Connection: ‘पुढारी’च्या दणक्याने गणेश मंडळांच्या वीजजोडणीचा प्रश्न ऐरणीवर; प्रक्रिया सुलभ करण्यासाठी यंत्रणा सरसावली

तात्पुरत्या जोडणीसाठी कागदपत्रे, शुल्क व परवानग्यांचा गुंता सोडविण्याची मागणी; मंडळांना वेळबद्ध सेवा आणि एक खिडकी व्यवस्था हवी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तात्पुरती वीजजोडणी घेताना येणाऱ्या अडचणींना दै. 'पुढारी'ने वाचा फोडल्यानंतर संबंधित यंत्रणा सरसावली आहे. 'पुढारी'ने आयोजित केलेल्या गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी कागदपत्रांची किचकट प्रक्रिया, विविध कार्यालयांत करावा लागणारा पाठपुरावा, जोडणी मिळण्यास होणारा विलंब आणि समन्वयाचा अभाव याकडे लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमीवर मंडळांना अधिकृत व सुरक्षित वीजजोडणी वेळेत मिळावी, यासाठी प्रक्रिया सुलभ करण्यासह आवश्यक मार्गदर्शन आणि समन्वयाची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येत आहे.

गणेशोत्सवात मंडपातील रोषणाई, देखावे, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनियंत्रणा आणि अन्य विद्युत उपकरणांसाठी मंडळांना तात्पुरत्या वीजजोडणीची आवश्यकता असते. मात्र, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे नेमकी कोणती, अर्ज कोठे करायचा, किती शुल्क भरायचे आणि जोडणी किती दिवसांत मिळणार, याबाबत अनेक मंडळांमध्ये संभ्रम असतो. विशेषतः लहान मंडळांना तांत्रिक बाबींची माहिती नसल्याने वारंवार कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात. 'पुढारी'च्या बैठकीत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी ही बाब प्रकर्षाने मांडली. महापालिका, पोलिस प्रशासन आणि वीज वितरण यंत्रणेच्या परवानग्यांचा एकमेकांशी संबंध असल्याने तिन्ही यंत्रणांमध्ये समन्वय असावा, अशी मागणी करण्यात आली. एका परवानगीअभावी संपूर्ण प्रक्रिया रखडू नये, अर्जातील त्रुटींची माहिती तातडीने द्यावी आणि कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर निश्चित कालमर्यादेत जोडणी उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षाही मंडळांनी व्यक्त केली होती.

बैठकीतील सूचनांच्या पार्श्वभूमीवर गणेश मंडळांना वीजजोडणीबाबत एकाच ठिकाणी आवश्यक माहिती मिळणे, विभागनिहाय संपर्क व्यवस्था उपलब्ध असणे आणि अर्जांवर तातडीने कार्यवाही होणे महत्त्वाचे ठरणार आहे. उत्सव काळात वीजपुरवठ्यात बिघाड झाल्यास तक्रारींचे तत्काळ निवारण करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत ठेवण्याची मागणीही पुढे आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मंडपांमध्ये मोठ्या संख्येने भाविकांची ये-जा असते. त्यामुळे अधिकृत व सुरक्षित वीजजोडणी हा केवळ रोषणाई किंवा देखाव्याचा विषय नसून भाविकांच्या सुरक्षेशीही संबंधित आहे. वीजजोडणी मिळण्यास विलंब झाल्याने मंडळांवर अनधिकृत अथवा असुरक्षित पद्धतीने वीज घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी उत्सवापूर्वीच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज आहे.

आता मंडळांना हवा प्रत्यक्ष दिलासा

'पुढारी'च्या बैठकीत मंडळांनी आपल्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या आहेत. दरवर्षी कागदपत्रे आणि परवानग्यांसाठी होणारी धावपळ यंदा टळावी, अशी पदाधिकाऱ्यांची अपेक्षा आहे. केवळ सूचना किंवा बैठका न होता प्रत्यक्ष अर्जापासून वीजजोडणी मिळेपर्यंत मंडळांना सुलभ आणि वेळबद्ध सेवा मिळाल्यास त्याचा शहरातील लहान-मोठ्या गणेश मंडळांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या मागण्यांकडे लक्ष

  • तात्पुरत्या वीजजोडणीची प्रक्रिया सुलभ व कालबद्ध करावी.

  • आवश्यक कागदपत्रे आणि शुल्काची माहिती आगाऊ प्रसिद्ध करावी.

  • विभागनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करावेत.

  • लहान मंडळांसाठी स्वतंत्र मार्गदर्शन व मदत कक्ष असावा.

  • महापालिका, पोलिस आणि वीज वितरण यंत्रणेत समन्वय ठेवावा.

  • शक्य असल्यास परवानग्यांसाठी 'एक खिडकी' व्यवस्था करावी.

  • वीजपुरवठ्यातील बिघाड दूर करण्यासाठी उत्सवकाळात स्वतंत्र पथक ठेवावे.

मंडपातील रोषणाईपेक्षा सीसीटीव्ही आणि सुरक्षेसाठीही अखंड वीजपुरवठा महत्त्वाचा आहे. तात्पुरत्या जोडणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात, किती शुल्क भरायचे आणि अर्जानंतर किती दिवसांत जोडणी मिळणार याची स्पष्ट माहिती आधीच मंडळांना द्यावी. प्रत्येक परिसरासाठी एक संपर्क अधिकारी दिल्यास छोट्या मंडळांची गैरसोय दूर होईल. महावितरणने मंडळांच्या अडचणी समजून घेत सुरक्षा प्रदान करण्याची आवश्यकता आहे.
संजय डोंगरे, अध्यक्ष, छत्रपती शिवाजी तरुण मित्रमंडळ, वडारवाडी.
आमच्या गणेश मंडळाचा स्वतःचा वीजमीटर आहे. मात्र, तात्पुरती वीजजोडणी घेणाऱ्या बहुतांश मंडळांकडून अनामत रक्कम तसेच जवळील रहिवाशाच्या वीजबिलाची प्रत घेतली जाते. गणेशोत्सवानंतर मंडळाने वीजबिलाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरही अनामत रक्कम तत्काळ परत मिळत नाही. अनेकदा ही रक्कम पुढील वर्षाच्या गणेशोत्सवातील वीजजोडणीसाठी समायोजित केली जाते. याचा विशेषतः लहान मंडळांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे वीजबिल भरल्यानंतर मंडळांची अनामत रक्कम तातडीने परत करण्याची व्यवस्था करावी.
भाऊ करपे, अध्यक्ष, सहकार तरुण मंडळ, रविवार पेठ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT