Vidyanand Bapat Pudhari
पुणे

Pune Noise Pollution: पुण्यात ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; विद्यानंद बापट आक्रमक, 'एक सेकंदही मिरवणुका....'

Pune Ganesh Festival Noise Pollution Row: पुण्यातील गणेशोत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विद्यानंद बापट यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

Rahul Shelke

Pune Ganesh Festival Noise Pollution Row: पुण्याच्या गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्यावर विद्यानंद बापट यांनी पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ध्वनी प्रदूषणाबाबत न्यायालयाने घेतलेली दखल स्वागतार्ह असल्याचे सांगत, नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली.

यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर न्यायालयाने स्वतःहून (सुमोटो) दखल घेतली होती. त्यामध्ये काही चांगले निर्णय झाले. त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भातही योग्य आणि परिणामकारक निर्णय होईल, अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली.

“अजूनही सर्रास नियमांचे उल्लंघन होत आहे. ध्वनी प्रदूषणासाठी ठरवून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे सक्तीने पालन करून घेणे अपेक्षित आहे,” असे बापट यांनी म्हटले. गेल्या आठ दिवसांमध्ये आपण स्वतः 112 क्रमांकावर फोन करून ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी केल्याचेही त्यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती समाधानकारक नसल्याचा दावा करत बापट म्हणाले की, त्यांनी काल आणि त्यापूर्वीही तक्रारी केल्या आहेत. मात्र, ध्वनी प्रदूषणाची समस्या केवळ तात्पुरत्या कारवाईने न सोडवता ती मुळापासून सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला जातो. मात्र, त्यातून अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याचा आरोप बापट यांनी केला. “सार्वजनिक निधीची अशा माध्यमातून उधळपट्टी होत आहे. करदात्यांचा पैसा वाया जात असून, त्याचा भार उत्सव आयोजकांकडून वसूल केला पाहिजे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

दरम्यान, सुमारे 150 मंडळांना परवानगी नाकारण्यात आली होती, हा निर्णय स्वागतार्ह होता; मात्र त्यानंतर पुन्हा परवानगी देण्यात आल्याचे बापट यांनी म्हटले. मिरवणुका रस्त्यावर अजिबात काढू नयेत, अशी मागणी करत शहराबाहेरील एखादा मार्ग एका दिवसासाठी उपलब्ध करून देण्याची भूमिका त्यांनी मांडली.

“उत्सव साजरा करणे ही जीवनावश्यक गोष्ट नाही. नागरिकांना त्रास होणाऱ्या प्रथा बंद केल्या पाहिजेत. तुमचा आनंद इतरांसाठी शिक्षा ठरेल, असे उत्सव नकोत,” असे बापट यांनी स्पष्ट केले. “जर डीजे बंदी झाली तर त्या रोषाला आनंदाने सामोरे जायला मी तयार आहे,” असे विद्यानंद बापट यांनी म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT