पुणे: अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अपरिपक्व डाळिंबांची तोड करून बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. बाजारात मोठ्या प्रमाणात कच्चा माल दाखल होत असून, त्याच्या खरेदीकडे खरेदीदारांनी पाठ फिरविल्याने रविवारी (दि. 5) डाळिंबाच्या दरात किलोमागे दहा टक्क्यांनी घट झाली आहे. तर, दुसरीकडे पावसामुळे तोड कमी प्रमाणात झाल्याने लिंबाची आवक घटली आहे. त्यातुलनेत मागणी चांगली असल्याने लिंबाच्या भावात पंधरा किलोच्या गोणीमागे शंभर ते दीडशे रुपयांनी वाढ झाली आहे.
बाजारात हापूस आंब्याची आवक अद्याप समाधानकारक नाही. त्यामुळे आंब्याचे दर हे अद्यापही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. तर, मागणीअभावी पेरूच्या भावात वीस किलोमागे शंभर ते दोनशे रुपयांनी घसरण झाल्याचे सांगण्यात आले. पावसामुळे कलिंगड, खरबूज, द्राक्षे, मोसंबी, संत्री यांसह बहुतांश फळांच्या आवकेसह मागणीत घट झाली आहे. फळबाजारात रविवारी (दि. 5) डाळिंब 15 ते 18 टन, पपई 15 ते 20 टेम्पो, लिंबाची सुमारे 700 ते 800 गोणी, कलिंगड 35 ते 40 गाड्या, खरबूज 20 ते 25 टेम्पा इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : 400-2000, मोसंबी : (3 डझन) : 150-350, (4 डझन) : 50-130, संत्रा : (10 किलो) : 500-1900, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 70-200, आरक्ता : 10-50, गणेश : 10-30, कलिंगड : 5-12, खरबूज : 10-25, पपई : 5-15, चिकू (दहा किलो) : 100-600, पेरू (20 किलो) : 400-600, अननस (1 डझन): 100-600, द्राक्षे : (15 किलो) : 500-1200, हापूस (5 ते 9 डझन) कच्चा 2500-4500.