Pomegranate Pudhari
पुणे

Pune Fruit Market Prices: पुणे फळबाजारात डाळिंबाला तेजी; मागणी वाढल्याने घाऊक दरात 10 टक्क्यांची वाढ

चांगल्या दर्जाच्या डाळिंबाची आवक वाढली; पपई महागली, लिंबाच्या दरात गोणीमागे ₹100 घसरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पावसाच्या हजेरीनंतर डाळिंबाच्या प्रतवारीत सुधारणा होऊ लागल्याने बाजारात चांगल्या दर्जाच्या मालाची आवक वाढत आहे. पुणे विभागातून मोठ्या प्रमाणात डाळिंब गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात दाखल होत आहे.

दरम्यान, देशातील विविध भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने परराज्यांतूनही मागणी वाढली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने डाळिंबाच्या घाऊक दरात गत आठवड्याच्या तुलनेत सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

दरम्यान, अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने पपईची मागणी कायम आहे. मात्र, आवक तुलनेने कमी असल्याने पपईच्या दरात किलोमागे पाच रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे, बाजारात लिंबाची आवक दुपटीने वाढली आहे. मात्र, मागणी मंदावल्याने १५ ते २० किलोच्या गोणीमागे सुमारे १०० रुपयांची घट झाली आहे. उर्वरित सर्व फळांची आवक आणि मागणी संतुलित असल्याने त्यांच्या दरात कोणताही विशेष बदल झाला नसल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

फळबाजारात रविवारी (दि. २६) लिंबू १२०० गोणी, मोसंबी २० ते २५ टन, संत्रा १ टन, डाळींब ४० ते ४५ टन, पपई ८ ते ९ टेम्पो, कलिंगड ४ ते ५ टेम्पो, खरबूज २ ते ३ टेम्पो, चिक्कू ३०० गोणी, पेरु ६०० ते ७०० क्रेट, पिअर ५०० ते ६०० क्रेटस्, नासपती दीड ते दोन हजार पेटी, सिताफळ ६ टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २०० ते ४००, मोसंबी : (३ डझन) : १३०-३२० (४ डझन) : ४०-१००, संत्रा : (१० किलो) : ३००-८००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, आरक्ता : १०-५०, गणेश : ५-२५, कलिंगड : ८-१२, खरबूज : १५-२५, पपई : १२-४०, चिक्कू (दहा किलो) : १००-६००, पेरु (२० किलो) : ४००-५००, अननस (१ डझन) : १००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१४०, नासपती (१६ ते १७ किलो) : १०००-१२००, पिअर (१० किलो) : १८००-२२००, अंजीर (१ किलो) ४००-५००.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT