पुणे: उन्हाच्या तीव्र चटक्यामुळे फुलांची गळ झाल्याने पपईच्या उत्पादनात घट झाली आहे. परिणामी, गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबाजारात पपईची आवक कमीच आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने मागणी वाढली आहे. त्यामुळे पपईच्या दरात किलोमागे पाच रुपयांनी वाढ झाली आहे. आखाडामुळे लिंबालाही चांगली मागणी असून, त्याच्या पंधरा ते वीस किलोच्या गोणीमागे शंभर रुपयांची वाढ झाली आहे.
गुजरातमधून येणाऱ्या चिकूचा हंगाम संपल्याने त्याची आवकही घटली असून, भावात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून मोसंबीची आवक वाढू लागली आहे. यामध्ये कच्च्या आणि हिरव्यागार मोसंबीचे प्रमाण सर्वाधिक आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने सदर फळांसह कलिंगड, खरबुजाला जेमतेम मागणी आहे. आवक आणि मागणी संतुलित असल्याने त्यांच्या दरात कोणताही विशेष बदल झाला नसल्याचे व्यापारीवर्गाकडून सांगण्यात आले.
फळबाजारात रविवारी (दि. 2) लिंबू 1100 ते 12०० गोणी, मोसंबी 40 ते 50 टन, संत्रा 2 टन, डाळींब 90 ते 100 टन, पपई 5 ते 6 टेम्पो, कलिंगड 8 ते 10 टेम्पो, खरबूज 1 ते 2 टेम्पो, चिक्कू 1०० गोणी, पेरु 6०० ते 7०० क्रेट, पिअर ५०० ते ६०० क्रेटस्, नासपती दीड ते दोन हजार पेटी, सिताफळ 10 ते 12 टन आणि अननसाची ५ ट्रक इतकी आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : ३०० ते ५००, मोसंबी : (३ डझन) : १६०-३५० (४ डझन) : ५०-१२०, संत्रा : (१० किलो) : १५०-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ४०-१५०, आरक्ता : २५-६०, गणेश : २०-५०, कलिंगड : ७-१०, खरबूज : १२-३०, पपई : १२-४०, चिकू (दहा किलो) : ४००-१०००, पेरू (२० किलो) : ४००-५००, अननस (१ डझन) : १००-६००, सीताफळ (१ किलो) : २०-१२०, नासपती (१६ ते १७ किलो) : १०००-१२००, पिअर (१० किलो) : १८००-२२००.