पुणे: सहाशे रुपयांवरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. राहुल राजेंद्र जवंजाळ (वय २२, रा. चंद्रकला निवास, बोराटे वस्ती, चंदननगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आशीष डेव्हीड मगर (वय २७, रा. सुभाषनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव असून, त्याला चंदननगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दोघेही डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात.
चाकूने भोसकल्यानंतर जखमी अवस्थेत राहुल याला आशिष याने रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. पोलिसांना ही माहिती मिळाली. आशिष याने दोन दिवसांत वेगवेगळे जबाब देत पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सर्व बाजूने केलेल्या तपासामुळे शेवटी त्याला खुनाची कबुली द्यावी लागली. याबाबत सहायक पोलिस निरीक्षक गणेश जगदाळे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा मूळचा अमरावती येथील राहणारा आहे. तो पुण्यात एकटाच राहत होता. तर, आशिष हा मावशीकडे राहतो. दोघेही पूर्वी एका बीपीओमध्ये काम करीत होते. तीन महिन्यांपूर्वी ती नोकरी सोडून ते झोमॅटो डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागले. ८ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता एका हॉस्पिटलमधून पोलिसांना फोन आला. एका तरुणाला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणले असता, त्याचा मृत्यू झाला आहे.
आशिष याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले, की राहुल याचा फोन आला होता. त्याने सांगितले की, अर्जंट रुमचे खाली ये, मला लागले आहे. त्यामुळे मी रुमच्या खाली गेलो. त्या वेळी त्याच्या मानेजवळ जखम झालेली होती. त्यातून रक्त येत होते. त्याला दवाखान्यात आणले असता, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आशिषच्या बोलण्यावर पोलिसांना संशय आल्याने पोलिस त्याला घेऊन राहुल याच्या रूमवर गेले. तेथे गेल्यावर त्याने परत पोलिसांना वेगळीच माहिती दिली. आशिष याने आता सांगितले की, ते दोघे झोमॅटोवर एकाच गाडीवरून डिलिव्हरीचे काम करीत होते. राहुलने त्याला सायंकाळी ६ वाजता फोन करून बोलावून घेतले. आशिष त्याच्या रूमवर गेला. तो बाथरूममध्ये गेला असताना राहुल याच्या ओरडण्याचा आवाज आला. तेव्हा आशिष वॉशरूममधून बाहेर आला. तेव्हा राहुल हा घरातील चाकूने स्वत:चे छातीमध्ये मारून घेतल्याने रक्त येऊ लागले होते. त्याला दुचाकीवर मागे बसवून हॉस्पिटलमध्ये जात असताना थोड्या अंतरावर गेल्यावर राहुल बेशुद्ध झाल्याने त्याला रिक्षाने प्रथम एका हॉस्पिटल व तेथून दुसऱ्या हॉस्पिटल येथे नेले, असे त्याने सांगितले.
रक्ताने भरलेले ब्लँकेट, दुचाकीवर रक्ताचे डाग
पोलिसांनी फॉरेन्सिक व्हॅनला बोलावून घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. रक्ताने भरलेले ब्लँकेट, टॉवेल जप्त केले. दुचाकीवर रक्ताचे डाग होते. गाडीही जप्त करण्यात आली. त्यानंतर दुसर्या दिवशी राहुल याची आई आल्याने पोलिसांनी शवविच्छेदन केले. त्यात खोलवर जखम झाल्याने मृत्यूचे कारण डॉक्टरांनी दिले. त्यामुळे आशिष मगर हा सांगत असलेल्या माहितीबद्दल पोलिसांना संशय वाटत होता. दि. ९ सप्टेंबर रोजी दिवसभर पोलिस त्याच्याकडे चौकशी करीत होते. शेवटी रात्री उशिरा आशिष याने परत आपला जबाब बदलला. त्याने सांगितले की, मी राहुल याला ६०० रुपये उसने दिले होते. त्याने वेळेमध्ये पैसे परत दिले नाही. त्याला पैशांसाठी अनेकदा फोन केले. परंतु त्याने फोनला प्रतिसाद न दिल्याने मी ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता त्याच्या खोलीवर गेलो.
''हातसे क्या मारता है, चाकूसे मार''
दोघामध्ये पैशावरून वाद झाला. तेव्हा राहुल याने घरातील चाकू घेऊन ''हातसे क्या मारता है, चाकूसे मार'' असे म्हणाला. तेव्हा मी नाही म्हणत असताना त्याने चाकू माझ्या हातात दिला. तेव्हा राहुलने मला आई वडिलांवरून शिवीगाळ केल्याने त्या रागाचे भरामध्ये मी तो चाकू राहुलच्या छातीत भोकसल्याने त्याला गंभीर जखमी केले. घरातील टॉवेल घेऊन राहुल याचे जखमेवर धरला. त्याला उठवून हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जिन्याने चालत बिल्डिंगच्या खाली घेऊन आलो. त्याच्या दुचाकीवर बसवून हॉस्पिटलमध्ये घेऊन निघालो. परंतु, थोड्या अंंतरावर तो बेशुद्ध झाल्याने गाडीवरून पडला. तेव्हा गाडी तेथेच सोडून रिक्षामध्ये घालून हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासणी करून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आशिष याने सांगितलेली हकिगत, घटना स्थळी मिळून आलेले परिस्थितीजन्य पुरावे, शवविच्छेदनाचा अहवाल यावरून राहुल याचा खून झाल्याचे समोर आले.