Murder Case Pudhari
पुणे

Pune Fraud Cases: पुण्यात फसवणुकीचा स्फोट; फ्रँचायझीपासून हज यात्रेपर्यंत कोट्यवधींचे घोटाळे उघड

फ्रँचायझी, जमीन व्यवहार, मेडिकल परवाना आणि हज यात्रेच्या नावाखाली नागरिकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: एका नामांकित आईस्क्रीम कंपनीची फ्रँचायझी देण्याच्या बहाण्याने ऑनलाइन नोंदणी करायला लावून एका तरुणाची आठ लाख 35 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी राहुल प्रदीप भोसले (वय 37, रा. मांजरी बुद्रुक) यांनी फिर्याद दिली असून, राजू शर्मा, तरुण गुप्ता आणि इतर बँक खातेधारकांविरुद्ध मांजरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादीने आईस्क्रीम व्यवसायासाठी ऑनलाइन फॉर्म भरला होता. त्यानंतर आरोपींनी त्यांना फ्रँचायझी देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी नोंदणी शुल्क आणि साहित्यासाठी पैसे भरण्यास सांगितले. दि. 15 मे 2025 ते 27 जून 2025 या कालावधीत फिर्यादीकडून आठ लाख 35 हजार रुपये उकळल्यानंतरही फ्रँचायझी न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.

प्लॉट देण्याच्या बहाण्याने चार लाखांची फसवणूक

एक गुंठा जागा दाखवून त्याचा व्यवहार पूर्ण न करता आणि घेतलेले पैसे परत न देता एका व्यक्तीची 4 लाख 35 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. सचिन अण्णासाहेब पेटारे (वय 35, रा. शिंदेनगर, जुनी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी आविष्कार लवटे, अनिल लवटे आणि प्रेम पोलकेवार (सर्व रा. मे. अनिल कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपर्स कात्रज) या तिघांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2022 पासून हा व्यवहार सुरू होता. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना एक गुंठा जागा दाखवली आणि सहा लाख 50 हजार रुपये घेतले. मात्र, जागा न देता केवळ दोन लाख 15 हजार रुपये परत केले. उर्वरित चार लाख 35 हजार रुपये आजवर परत न देता आरोपींनी संगनमताने फिर्यादीची फसवणूक केली.

वाघोलीत मोलकरणीने लांबवले पाच लाखांचे दागिने

विश्वासू समजल्या जाणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलेनेच मालकाच्या कपाटातील पाच लाख 45 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार वाघोलीत उघडकीस आला आहे. याप्रकरणी लीना राजन मांढरे (वय 63, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली असून, घरकाम करणारी महिला कल्पना हाथगले हिच्याविरुद्ध वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 5 जानेवारी ते 9 फेबुवारी 2026 दरम्यान घडला. आरोपी कल्पना ही फिर्यादीच्या घरी घरकाम करत होती. तिने बेडरुममधील कपाटाचे लॉकर उघडून त्यातील सोन्याचे दागिने मालकाच्या संमतीशिवाय चोरून नेले. फिर्यादीने दागिने तपासले असता चोरीचा प्रकार उघड झाला.

बनावट संमतिपत्र तयार करून मेडिकल मालकाची फसवणूक

भागीदारीत असलेल्या मेडिकल स्टोअरचे बनावट संमतिपत्र तयार करून शासनाची आणि भागीदाराची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समर्थ पेठ परिसरात उघडकीस आला आहे. मुकुंद श्रीरंग लोया (वय 55, रा. एनआयबीएम रोड, महंमदवाडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी सर्वेश सचिन अलकोंडा (वय 20, रा. सोमवार पेठ, नरपतगिरी चौक), पार्थ सुनील साठे (वय 20, रा. मंगळवार पेठ) आणि वैष्णव विजयराव बोरकर (वय 31, रा. सोमवार पेठ) यांच्याविरुद्ध समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‌‘ओम आदेश मेडिकल अँड जनरल स्टोअर्स‌’मध्ये फिर्यादी आणि आरोपी भागीदार आहेत.

आरोपींनी 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर फिर्यादीची बनावट सही करून संमतिपत्र तयार केले. या आधारे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून मेडिकल परवाना मिळवून फिर्यादीचा विश्वासघात करीत फसवणूक केली. फिर्यादी यांनी आरोपींना संमतिपत्राची मागणी करून जाब विचारला असता, आरोपींनी फिर्यादीला धमकी दिली.पुण्यात फसवणुकीचा स्फोट; फ्रँचायझीपासून हज यात्रेपर्यंत कोट्यवधींचे घोटाळे उघड

स्वस्त दरात हज यात्रेचे आमिष दाखवून 21 लाखांचा गंडा

उमरा आणि हज यात्रा स्वस्त दरात करून देण्याच्या बहाण्याने 70 ते 80 गुंतवणूकदारांची 21 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शेहजाद मोहम्मद इस्लाम शेख (वय 34, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली असून, अमीर सरदार शेख (वय 38), मिस्बा अमीर शेख (वय 35) आणि रसाबीर रियाज शेख (वय 38) यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी अलखली फाटुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीच्या माध्यमातून स्वस्त दरात हज आणि उमरा यात्रेच्या जाहिराती केल्या होत्या. दि. 19 मार्च 2026 ते 15 मे 2026 दरम्यान आरोपींनी 70 ते 80 लोकांकडून यात्रेसाठी आगाऊ रक्कम जमा केली. मात्र, प्रत्यक्षात यात्रा न घडवता किंवा पैसे परत न करता 21 लाख 50 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT