File Photo
पुणे

Pune Fraud Case : गुंतवणुकदारांना कोट्यवधींना चुना, अजय चौधरीचा जामीन फेटाळला

सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

पुणे : सरकारी मॅग्नेट प्रोजेक्टच्या नावाखाली गुंतवणूकदारांची 9 कोटी 50 लाख रुपायांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपी अजय श्यामकांत चौधरी (रा. गजनिया गार्डन, भांडारकर रोड) याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला. याप्रकरणात, आतापर्यंत 11 हून अधिक जणांची फसवणूक झाली असून 3 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत, राहुल रामराजे मक्तेदार (वय 43, रा. शंकर कलाटेनगर, वाकड) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

येरवडा येथील कारागृहात असलेल्या चौधरी याने गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकारी वकीलांसह मूळ फिर्यादितर्फे अ‍ॅड. प्रतिक राजोपाध्ये, अ‍ॅड. अमेय रानडे व अन्य एका फिर्यादितर्फे अ‍ॅड. निखील कुलकर्णी यांनी विरोध केला. चौधरी अन्य साथीदारांनी परस्पर संगनमताने पंचगणी देवस्थान ट्रस्टच्या भोगवटादार वर्ग 3 च्या जमिनीचा विकास करण्याच्या नावाखाली शासन व प्राधिकरणाची परवानगी न घेता गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारून गुंतवणूकदारांसह शासनाचीही फसवणूक केली आहे. चौधरीकडून सुहास वाकडे यांच्या खात्यावर 75 लाख रुपये रक्कम हस्तांतरित झाल्याचे आढळून आले आहे. आरोपींमार्फत गुंतवलेली रक्कम नेमकी कुठे वापरली गेली, त्यांनी जंगम किंवा स्थावर मालमत्ता खरेदी केली आहे का? याचा तपास करायचा आहे.

चौधरी आणि नाहाटा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार झाले आहे. गुन्ह्याचा तपास अद्याप प्राथमिक टप्प्यात असल्याने आरोपीच्या चौकशीसह साक्षीदारांचे जबाब नोंदविणे अद्याप बाकी आहे. एफआयआरमध्ये त्याचे नाव नमूद असून भाडेपट्टा कराराच्या आधारावर 43 कोटी रुपयांचे व्यवहार शासनाला माहिती न देता करण्यात आलेले आहे. त्याला जामीन मंजूर झाल्यास तो तपासास सहकार्य करणार नाही. साक्षीदारांना धमकाविण्यासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो यापूर्वीही वारंवार परदेशात गेला असून खटल्याच्या सुनावणीस हजर राहणार नाही, असा युक्तीवाद सरकारपक्षासह अ‍ॅड. राजोपाध्ये, अ‍ॅड. रानडे व अ‍ॅड. कुलकर्णी यांनी केला.

तत्कालीन सभापती नाहाटा अद्याप फरारच

याप्रकरणात, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे तत्कालीन सभापती बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार नाहाटा यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. तर, चौधरी व जोशी हे येरवडा कारागृहात आहे. याप्रकरणात आतापर्यंत 11 जणांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, फसवणुकीचा आकडा 9 कोटी 49 लाख 35 हजारांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जामीन फेटाळण्याची प्रमुख कारणे

  • मोठी आर्थिक रक्कम गुंतविली गेल्याने गुन्ह्याची व्याप्ती मोठी

  • गुंतवणुकीसाठी देवस्थानच्या जमिनींचाही आरोपींकडून वापर

  • चौधरीचे अन्य साथीदार प्रविणकुमार नाहाटा अद्याप फरार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT