वनविभागाची मोठी कारवाई; ५०० किलो मोरपिसांचा साठा जप्त  
पुणे

Pune News : वनविभागाची मोठी कारवाई; ५०० किलो मोरपिसांचा साठा जप्त

मोरपिसे बाहेरच्या राज्यातून आणल्याची प्राथमिक माहिती: ११ जण ताब्यात

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शहरात तब्बल ४०० ते ५०० किलो मोरपिसांचा साठा जप्त करण्यात शुक्रवारी (दि.४) वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले. शहरातील सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात सापळा रचून वनविभागाने कारवाई करत ११ जणांना ताब्यात घेतले. हा साठा ज्या ठिकाणी ठेवला होता तो पाहून वनविभागाचे कर्मचारीही आश्चर्यचकीत झाले.आजवरची ही पुणे वनविभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ही मोरपीसे बाहेरच्या राज्यातून तस्करी करीत पुण्यात आली असल्याचा दावा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

शहरातील सोमवार पेठेतील नरपतगीरी चौक भागात शुक्रवारी हजारो किलो मोरपिसांची अवैधरित्या साठवणूक करूण विक्री करण्यात येणार असल्याची गुप्त माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वनविभागाने सापळा रचून ११ जणांना ताब्यात घेतले.त्यांची चौकशी केली असता मोराची पिसे विक्री करण्यासाठी आणली असल्याचे सांगितले. मात्र, आरोपींची आणखी कसून चौकशी केल्यावर श्री.संत गाडगेबाबा धर्मशाळा येथील वसाहतीमध्ये आमचे इतर सहकाऱ्यांनी मोराची पिसे साठवली असल्याची माहिती दिली.

400 ते 500 किलो पिसांचा साठा

आरोपींनी कबुली देताच वनविभागाच्या टिमने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सुमारे ४०० ते ५०० किलो मोर पिसांचा ढिगच दिसून आला. हा प्रकार पाहून अधिकारी कर्मचारी चकीत झाले. त्यांनी तो साठा जप्त करीत आरोपींना ताब्यात घेतले.

सर्व आरोपी उत्तरप्रदेशातले..

वनविभागाने दिलेल्या माहितीनसार सर्व आरोपी हे मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहेत. त्यांच्या विरुध्द वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. ही कारवाई वनसंरक्षक आशिष ठाकरे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते तसेच सहाय्यक वनसंरक्षक मंगेश ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (फिरते पथक) ऋषिकेश चव्हाण, मनोज बारबोले, सुरेश वरक यांनी केली.

मोरपिसांबाबत केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. ही मोरपिसे राज्याबाहेरुन शहरात आणली आहेत. ती पुणे किंवा महाराष्ट्रातील नाहीत. कारण हे सर्व आरोपी उत्तरप्रदेशातील आहेत. शनिवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
मनोज बारबोले,अधिकारी वनविभाग भांबुर्डा परिक्षेत्र,पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT