पुणे

Pune : सीओईपीत आता परदेशी विद्यार्थ्यांनाही प्रवेश!

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जागतिक क्रमवारीमध्ये परदेशी विद्यार्थी हा महत्त्वाचा घटक ठरत असल्याने सीओईपी तंत्रशास्त्र विद्यापीठात आता परदेशी विद्यार्थ्यांनाही प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्याचबरोबर यंदा ट्रान्स्पोर्ट प्लॅनिंग हा नवा एमटेक अभ्यासक्रम तसेच पब्लिक पॉलिसी हा क्रेडीट बेस्ड अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुनील भिरुड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनावणे या वेळी उपस्थित होते.

विद्यापीठातील विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी केपीएमजी या संस्थेची नियुक्ती करण्यात आली होती. या संस्थेने त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचा सीओईपीमधील अनुभव समृद्ध करणे, बहुविद्याशाखीय दृष्टिकोन विकसित करणे, उच्च दर्जाच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे, उद्योग क्षेत्राशी सहकार्य करार करणे, उद्योजकता विकास, नवतंत्रज्ञान संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना देणे, डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करणे याबाबत शिफारसी करण्यात आल्या आहेत.
डॉ. चौधरी म्हणाले, सीओईपीचे जगभरात 45 हजार माजी विद्यार्थी आहे.

त्यांना पुन्हा सीओईपीशी जोडून घेण्यावर भर दिला जाणार आहे. आयआयटी मद्रासच्या रीसर्च पार्कचा अभ्यास करून त्यानुसार चिखली येथील संकुलात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या सहकार्याने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याशिवाय फ्लेम विद्यापीठाच्या सहकार्याने सार्वजनिक धोरण (पब्लिक पॉलिसी) या विषयांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.

डॉ. भिरुड म्हणाले, महाविद्यालयाचे विद्यापीठात रुपांतर झाल्यानंतर येणार्‍या काही अडचणी दूर करण्यात येत आहेत. त्यासाठी संस्थात्मक रचनेमध्ये बदल, एकरूप परिनियम, अधिनियम तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. एक वाहन कंपनीतर्फे ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम नोकरदारांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे.

संशोधन प्रकल्पातून निधी

संरक्षण विभागासह विविध संस्थांचे एकूण पाच संशोधन प्रकल्प सीओईपी विद्यापीठाला मिळाले आहेत. त्यातून सुमारे तीन कोटींचा निधी प्राप्त होणार असल्याची माहिती डॉ. सोनावणे यांनी दिली.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT