पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणेकरांच्या खाद्यसंस्कृतीत मोलाची भर घालणार्या दोन उत्पादनांनी जागतिक खाद्य नकाशावर नाव कोरले आहे. कॅम्पमधील कयानी बेकरी आणि चितळे बंधू मिठाईवाले अशी खाद्यसंस्कृतीचा झेंडा उंचावणार्या उत्पादकांची नावे आहेत. चितळ्यांची बाकरवडी आणि कयानीच्या मावा केकचा समावेश जगातील लोकप्रिय उत्पादनांमध्ये करण्यात आला आहे. जगप्रसिद्ध टेस्ट अॅटलास या खाद्य मार्गदर्शकाने आघाडीच्या 150 मिठाई केंद्रांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पुण्यातील चितळे आणि कयानीने स्थान मिळवले आहे. लिस्बनमधील रूआ डी बेलेम यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.
कयानी बेकरी ही कॅम्पमध्ये इस्ट स्ट्रीटवर असून, त्यांचा मावा केक प्रसिद्ध आहे. इराणमधून आधी मुंबईत आणि तिथून नंतर पुण्यात आलेल्या खोडायार, होरमाजदियार आणि रुस्तम या कयानी बंधूंनी 1955 मध्ये ही बेकरी सुरू केली. त्यांची पुढील पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. कयानी बेकरी मावा केक, रम बिस्कीटसह विविध उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे.
चितळे बंधू मिठाईवाले यांची सुरुवात 1950 मध्ये झाली. रघुनाथ चितळे आणि नरसिंह चितळे या बंधूंनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे पहिले दुकान बाजीराव रस्त्यावर सुरू झाले. त्यांची तिसरी पिढी हा व्यवसाय सांभाळत आहे. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही चितळेंची उत्पादने पोहोचली आहेत. बाकरवडी आणि विविध प्रकारच्या मिठायांसाठी चितळे बंधू ओळखले जातात.
क्रोएशियातील झाग्रेब इथे 2015 साली पत्रकार मतिजा बाबिक यांनी 'टेस्ट अॅटलास'ची स्थापना केली. जगभरातील खाद्यसंस्कृतीचा आढावा या संस्थेमार्फत घेतला जातो. पदार्थातील लोकप्रियता, खाद्यसंस्कृतीतील त्यांचे स्थान अशा विविध बाबींचा विचार करून खाद्यपदार्थांची यादी तयार केली जाते.
हेही वाचा