अशोक मोराळे
पुणे: कोणी खंडणी उकळण्यासाठी ट्रिगर दाबतोय... कोणी लूटमार करताना थेट गोळ्या झाडतोय... तर कोणी जुन्या वैराचा हिशेब चुकता करण्यासाठी बंदुकीचा आधार घेतोय. एकेकाळी शांत आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात आता गोळीबाराचे सत्रच सुरू असल्याचे दिसते. १ जानेवारी ते ५ ऑगस्ट २०२६ या अवघ्या सात महिन्यांत शहरात ३० च्या आसपास गोळीबाराच्या घटना घडल्याने पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. धक्कादायक म्हणजे या घटनांमधील अनेक आरोपी हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला आहे का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार पूर्ववैमनस्य, खंडणी, लुटमार, आर्थिक व्यवहारातील वाद आणि टोळ्यांतील वर्चस्वाची लढाई ही गोळीबारामागील काही प्रमुख कारणे आहेत. किरकोळ वादाचे काही तासांत रक्तरंजित संघर्षात रूपांतर होत असून, बंदुकीच्या गोळ्यांनी वैर मिटविण्याची धोकादायक प्रवृत्ती वाढीस लागली आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील सुरक्षिततेची भावना दिवसेंदिवस कमी होत आहे. सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे भरदिवसा वर्दळीचे चौक, हॉटेलसमोर, व्यावसायिक भाग आणि सार्वजनिक रस्त्यांवर, गर्दीने गजबजलेल्या वस्तींच्या परिसरात गोळ्या झाडल्या जात आहेत. प्रत्येक घटनेनंतर आरोपींना अटक झाल्याचे पोलिस सांगतात; मात्र, काही दिवसांतच शहराच्या दुसऱ्या टोकाला पुन्हा बंदुका धडाडतात. त्यामुळे कारवाईपेक्षा गुन्हेगारांचे मनोबलच वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
शहरात सध्या बंडू आंदेकर आणि सोमनाथ गायकवाड टोळीतील बदला युद्ध धुमसते आहे, त्यातून गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. काही गंभीर कट पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे उधळले गेले, ही जमेची बाजू असली तरी संघटित गुन्हेगारीचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे वास्तव नाकारता येत नाही. गेल्याच महिन्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीने फुरसुंगी परिसरातील एका व्यावसायिकाच्या गोदामावर खंडणीसाठी गोळीबार करून थेट आव्हान दिले. या प्रकरणातील आरोपींना राजस्थान आणि हरियाणा सीमेवरून अटक करण्यात पोलिसांना यश आले, तर गेल्या आठवड्यात खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ, लोहियानगर परिसरात एकाच दिवशी गोळीबाराच्या दोन घटना घडल्या.
एका प्रकरणात तीन राऊंड फायरिंग, तर दुसऱ्या ठिकाणी दोन ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनांची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हे शाखा युनिट-१, खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि तपास पथकातील कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या. या काही ठळक गोळीबाराच्या घटना असल्या तरी इतर गोळीबाराच्या घटना देखील तेवढ्याच गंभीर आहेत. लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावडेवाडी-सिरसवाडी परिसरातील घटना तर अधिकच धक्कादायक ठरली. जमीन खरेदी-विक्री व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकावर गोळीबार करून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटले. त्यानंतर याच आरोपींनी मध्य प्रदेशात पोलिसांना पाहून हवेत गोळीबार केला. खरं तर आतापर्यंत कोयत्याचा धाक दाखवून किंवा मारहाण करून लूटमारीच्या घटना शहरात घडत होत्या; मात्र, आता थेट गोळीबार करून लूटमार करण्याइतकी गुन्हेगारांची हिंमत वाढल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
विशेष म्हणजे यातील काही आरोपी उत्तर प्रदेश पोलिसांच्या रेकॉर्डवरील असल्याचे समजते. शहरातील गोळीबाराच्या घटना नवीन नाहीत; मात्र, गेल्या काही महिन्यांत त्यांची वारंवारता आणि निर्ढावलेपणा दोन्ही वाढल्याचे दिसून येत आहे. एकीकडे अवैध पिस्तूल तस्करीला मोठा आळा घातल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. मध्य प्रदेशातील गावठी पिस्तुले तयार करणाऱ्या गावांपर्यंत पोहोचून कारवाईही करण्यात आली. मात्र, तरीही शहरात अवैध पिस्तुलांचा पुरवठा सुरूच असल्याचे वास्तव समोर येत आहे. त्यामुळे अगदी काही हजारात पिस्तुले सराईतांना उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. याहून गंभीर बाब म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा शस्त्रे हाती घेत आहेत. पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल करून आरोपींना अटक केली असली, तरी गोळीबाराच्या वाढत्या घटनांनी त्यांच्या प्रतिबंधात्मक यंत्रणेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. केवळ गुन्ह्यानंतर आरोपी पकडून चालणार नाही; तर संघटित गुन्हेगारी, अवैध शस्त्रतस्करी आणि टोळीयुद्धाच्या मुळावर पोलिसांना घाव घालावा लागणार आहे. अन्यथा पुणे शहराची ओळख 'ट्रिगर सिटी' अशी होण्याचा धोका नाकारता येणार नाही.