Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती; शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

जलसंपदा विभागाने तातडीने पाहणी करून गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Dimbhe Dam Water Leakage
Dimbhe Dam Water LeakagePudhari
Published on
Updated on

मंचर: पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागासह अहिल्यानगर, सोलापूर आणि बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या हुतात्मा बाबू गेनू सागर डिंभे धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. याबद्दल शेतकरी व नागरिकांनी चिंता व्यक्त केली. जलसंपदा विभागाने तातडीने पाहणी करून गळती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सुमारे साडेतेरा टीएमसी क्षमतेच्या या धरणातून येडगाव धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. त्यानंतर हे पाणी जुन्नर तालुक्यांबरोबरच अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा, बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी आणि सोलापुरातील करमाळा आदी भागांतील शेती सिंचनासाठी उपयोगी पडते.

Dimbhe Dam Water Leakage
Water Quality Report: हवेली, शिरूर तालुक्‍यातील पाणी पिण्यास, शेतीसाठी अयोग्य!

डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून आंबेगाव व शिरूर तालुक्यातील सुमारे ५० गावांना सिंचनाचा लाभ मिळतो. घोड नदीवरील आंबेगाव व शिरूर तालुक्यातील २५ बंधाऱ्यांनाही वर्षभर पाणी उपलब्ध राहते. धरणाच्या भिंतीतून पाण्याची गळती वाढली आहे. काही भागांत पाण्याचे फवारे उडत आहेत. सातत्याने होणाऱ्या गळतीमुळे धरणाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या काही वर्षांत धरणाच्या भिंतीची आवश्यक दुरुस्ती न झाल्याने ही समस्या गंभीर बनत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या धरण पूर्णक्षमतेने भरले असून, सांडव्यावरून घोड नदीपात्रात विसर्ग सुरू आहे.

Dimbhe Dam Water Leakage
EF form voter verification: मतदार अर्ज भरण्याची उद्याची अंतिम मुदत

त्यामुळे धरणाची नियमित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती तातडीने हाती घ्यावी, अशी मागणी विठ्ठलवाडी येथील शेतकरी प्रा. वसंतराव भालेराव आदींनी केली आहे.

डिंभे धरणाच्या भिंतीतील गळतीची तांत्रिक तपासणी नियमित सुरू आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार आवश्यक दुरुस्ती व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येतील. धरणाच्या सुरक्षिततेबाबत नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. जलसंपदा विभाग परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे.

- गणेश नान्नोर, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news