FDA Action Pudhari
पुणे

Pune FDA Action: दिवाळीच्या फराळावर FDA ची धडक! पुण्यात ८७.६ किलो अनारसे जप्त

कमी दर्जा आणि लेबल नियमांच्या उल्लंघनाचा संशय; १७ हजार ५२० रुपयांचा साठा जप्त, राज्यभरातील १४ आस्थापनांवर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: दिवाळीच्या फराळासाठी मिठाईची खरेदी वाढत असताना, पुण्यातील मिठाई उत्पादक आस्थापनातून ८७.६ किलो अनारसे अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जप्त केले आहेत. कमी दर्जा आणि लेबलविषयक नियमांचे उल्लंघन केल्याचा संशय आल्याने ही कारवाई करण्यात आली. १७ हजार ५२० रुपये किमतीचा हा साठा जप्त करण्यात आला असून, सणासुदीच्या काळात मिठाईच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

एफडीएने २५ आणि २६ ऑक्टोबर रोजी राज्यभरात विशेष तपासणी मोहीम राबवली. त्यात पुणे विभागातील सुखसागरनगर येथील ‘प्रथमेश प्रॉडक्ट्स अँड महिला गृह उद्योग’ या आस्थापनावर कारवाई करण्यात आली. येथील अनारशांच्या साठ्याबाबत कमी दर्जा आणि खोट्या किंवा लेबलविषयक नियमांचे उल्लंघन असल्याची माहिती देण्यात आली.

सणासुदीच्या काळात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांना मोठी मागणी असते. अशा वेळी उत्पादनाची गुणवत्ता, वापरण्यात येणारा कच्चा माल, स्वच्छतेचे निकष आणि पॅकिंगवरील माहिती यांची तपासणी महत्त्वाची असल्याने अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत संशय व्यक्त होत असल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे या वेळी एफडीएकडून नमूद करण्यात आले.

दरम्यान, राज्यव्यापी मोहिमेत सात विभागांतील १४ आस्थापनांमधून २५ लाख ५३ हजार ७५८ रुपयांचा अन्नसाठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये कालबाह्य पॅकबंद पदार्थ, चिप्स, सुका मेवा, गव्हाचे पीठ, खोबरा पावडर, दूध आणि शीतपेयांचाही समावेश आहे. या व्यापक कारवाईच्या तुलनेत पुणे विभागातील कारवाई एका आस्थापनापुरती मर्यादित असली, तरी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दर्जाकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात फराळाचे पदार्थ, मिठाई यांना मागणी असते. परंतु, नागरिकांनी मिठाई आणि फराळाचे पदार्थ खरेदी करताना विक्रेत्याची विश्वासार्हता, पॅकिंगवरील माहिती आणि उत्पादनाची गुणवत्ता तपासावी. संशयास्पद किंवा कमी दर्जाचे अन्नपदार्थ आढळल्यास एफडीएच्या एफडीए कार्यालयात संपर्क साधावा.
तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न-औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्र राज्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT