FDA Pudhari File Photo
पुणे

Pune FDA Raid: पुण्यात एफडीएची धडक कारवाई; ५६ लाखांचा संशयास्पद अन्नसाठा जप्त, ९ आस्थापना सील

भेसळखोर मिठाई दुकाने, हॉटेल्स आणि बेकरींवर छापे; गुटखा-पान मसाल्याच्या कारवाईत १५ जणांना अटक

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सणासुदीच्या तोंडावर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात जोरदार मोहीम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत पुण्यात धडक कारवाई करीत ५६ लाखांहून अधिकचा साठा जप्‍त केला असून, १२ प्रमुख आस्‍थापनांवर धाडी टाकल्या आहेत. तसेच प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुवासिक तंबाखूविरोधात कारवाई करत ९ आस्थापना सील करून १५ जणांना अटक केली आहे.

या मोहिमेदरम्यान पुणे जिल्ह्यातील कोंढवा, गुलटेकडी, मंचर, दौंड तसेच विविध भागांत लेबलदोष आणि भेसळीच्या संशयावरून १२ प्रमुख आस्थापनांवर धाडी टाकण्यात आल्या. यात तब्बल ५६ लाख ३६,३६६ रुपयांचा संशयास्पद व निकृष्ट अन्नपदार्थांचा साठा जप्त केला.

दुग्धजन्य पदार्थ जसे की खवा, पनीर, तूप, बटर तसेच फॅट स्प्रेड आणि गुळाच्या नमुन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत व अस्वच्छता आढळली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि आरोग्याशी खेळणाऱ्या राज स्वीट्स, चैतन्य स्वीट्स, जसलोक स्वीट्स, तुळशी स्वीट्स यांसारख्या प्रसिद्ध मिठाई दुकानांसह हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बेकरींचे परवाने जनहितार्थ तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.

१५ जणांना अटक

तसेच, प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुवासिक तंबाखूविरोधात कारवाई करत २० लाख २६ हजार रुपयांचा साठा जप्त केला असून, ९ आस्थापना सील करून १५ जणांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT