FDA Action Pudhari
पुणे

Pune FDA Food Safety Action: सणासुदीपूर्वी पुणे FDA ची धडक कारवाई; दोन आस्थापनांचे परवाने निलंबित

खवा, पनीर, तूप, बटर आणि मिल्क पावडरच्या साठ्यात अनियमितता; लेबलिंग त्रुटी व निकृष्ट दर्जाच्या संशयावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत पुणे जिल्ह्यातील पाटस (दौंड), मंचर आणि पुणे शहरातील मार्केट यार्ड परिसरातील अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

यामध्ये निकृष्ट दर्जाचा संशय, लेबलिंगमधील त्रुटी तसेच मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळल्याने दोन आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व औषध प्रशासनाने क्रिमी डिलाईट पाटस, दौंड, पुणे येथे तपासणी केली.

यावेळी काऊ मिल्‍क बटर आणि स्‍कीम्ड मिल्‍क पावडर असा एकूण १ हजार ५१९ किलो अन्नसाठा आढळून आला. त्याची किंमत ८ लाख ५० हजार ७०२ रुपये आहे. या अन्नपदार्थांच्या लेबलिंगमध्ये त्रुटी आढळल्या असून, त्यांचा दर्जा निकृष्ट असण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

महावीर डेअरी मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथे तपासणी करण्यात आली. यावेळी ४९ किलो खवा/खोया (१३ हजार ७२०), १०४ किलो पनीर (३१ हजार २००) आणि ११ किलो तूप (७ हजार ९२०) असा साठा आढळून आला. या अन्नपदार्थांचा दर्जा निकृष्ट असण्याचा संशय असून, त्यानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

गणेशोत्सव तसेच आगामी नवरात्र, दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर विशेष मोहीम राबविली आहे. ११ ते १४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मिठाई, फरसाण, दूध, खवा, पनीर, तूप, ड्रायफ्रूट आदी अन्नपदार्थांच्या उत्पादकांपासून किरकोळ विक्रेत्यांपर्यंत तपासण्या करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT