Pune FC Road Encroachment Pudhari
पुणे

Pune FC Road Encroachment: एफसी रोडवर पुन्हा अतिक्रमणाचा बाजार; पदपथ पादचाऱ्यांसाठी की फेरीवाल्यांसाठी? नागरिकांचा सवाल

महापालिका-पोलिसांच्या कारवाईच्या घोषणांनंतरही अनधिकृत पथारी व्यावसायिकांचा कब्जा कायम; नागरिकांना वाहतुकीतून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या नामदार गोखले रस्त्यावर (एफसी रोड) पदपथांवर पुन्हा एकदा अनधिकृत पथारी व्यावसायिकांचे संपूर्ण वर्चस्व पाहायला मिळत आहे. शनिवारी भरदुपारी पदपथांवर मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी ठाण मांडल्याने पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागाच उरली नव्हती. परिणामी, नागरिकांना भरधाव वाहतूक, दुहेरी-तिहेरी पार्किंग आणि वाहनांच्या गर्दीतून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला. माध्यमांनी वारंवार हा प्रश्न ऐरणीवर आणूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र कायम आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील नामदार गोखले रस्ता हा शहरातील तरुणाईचे प्रमुख आकर्षण मानला जातो. त्यामुळे या परिसरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लक्ष्य करून विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या अनधिकृत पथारी व्यावसायिकांची संख्या मोठी आहे. कपडे, सौंदर्यप्रसाधने, कृत्रिम दागिने, छत्र्या, पादत्राणे, बॅग्ज, खाद्यपदार्थ अशा विविध वस्तूंची विक्री पदपथांवरच सुरू असल्याने नागरिकांना चालण्यासाठी जागाच मिळत नाही.

विशेष म्हणजे, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत दोन्ही बाजूंचे पदपथ अनधिकृत विक्रेत्यांनी व्यापले होते.

त्याचबरोबर अनेक इमारतींच्या पार्किंग, फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनमध्येही अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याने पदपथ हे पादचाऱ्यांसाठी आहेत की बाजारपेठेसाठी? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा ट्रक परिसरात फेरी मारून गेला; मात्र त्याचा अनधिकृत विक्रेत्यांवर कोणताही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. कारवाईची भीती नसल्याने व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरूच होता.

दोन्ही आयुक्तांच्या घोषणा विरल्या हवेत

११ मार्च २०२६ रोजी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शहरातील पदपथ, इमारतींची पार्किंग, फ्रंट व साइड मार्जिनमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायांवर कठोर कारवाईचा इशारा दिला होता. प्रायोगिक तत्त्वावर नामदार गोखले रस्ता (एफसी रोड) आणि काही निवडक ठिकाणांवर अशी कारवाई करून पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल. तसेच लवकरच एफसी रोडचे चित्र पूर्णपणे बदलेल, असा ठाम दावा दोन्ही आयुक्तांनी केला होता. मात्र, प्रत्यक्षात अनेक महिने उलटल्यानंतरही एफसी रोडवरील अनधिकृत व्यवसाय पूर्ववत सुरूच असल्याने प्रशासनाच्या घोषणांचा फोलपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधीही दुर्लक्ष करीत असल्याने या अनधिकृत व्यवसायांना राजकीय आश्रय असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT