पुणे: पती आणि पत्नी यांच्या उत्पन्नात लक्षणीय तफावत असल्यास पत्नीला तिच्या शिक्षण आणि सामाजिक दर्जानुसार सन्मानाने जगता यावे, यासाठी पोटगी देणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष काढत कौटुंबिक न्यायालयाने डॉक्टर पत्नीला दरमहा 10 हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश दिला आहे. कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश शुभांगी यादव यांनी हा आदेश दिला. पत्नीने मिळकत व जबाबदारीचे प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या 17 मेपासून ही अंतरिम पोटगी लागू राहणार असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
वैभव व वैभवी (नावे बदललेली) यांचा विवाह फेबुवारी 2021 मध्ये झाला होता. मात्र, मार्च 2024 पासून दोघे विभक्त राहात होते. पत्नीने पतीकडून झालेल्या क्रूरतेचा आरोप करत घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाच्या निकालासाठी वेळ लागणार असल्याने पत्नीने ॲड. भारती जागडे आणि ॲड. अक्षय जागडे यांच्यामार्फत अंतरिम पोटगीची मागणी केली.
पत्नीच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, पतीचे मासिक उत्पन्न 1 लाख 25 हजार रुपये आहे. हडपसर येथे त्याच्याकडे 1 बीएचके सदनिका असून, अन्य ठिकाणीही मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न असल्याचेही न्यायालयात सादर कागदपत्रांतून स्पष्ट होत असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.
यास पतीच्या वतीने विरोध करण्यात आला. पत्नी ही दंतचिकित्सक असून, तिला दरमहा 25 ते 30 हजार रुपये उत्पन्न मिळते. तिच्या बँक खात्यातील व्यवहारांवरून पगाराव्यतिरिक्त उत्पन्न असल्याचेही दिसते, असा दावा करण्यात आला. तसेच पतीचा पगार सव्वा लाख असला तरी त्याचा मासिक खर्च तब्बल 1 लाख 24 हजार 420 रुपये असल्याचे सांगण्यात आले. पत्नी विमानाने प्रवास करते व नियमितपणे गोवा, केदारनाथ, हिमाचल प्रदेश व तिबेटसारख्या पर्यटनस्थळांना भेट देते.
त्यामुळे तिच्या राहणीमानावरून पोटगीची आवश्यकता नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर, पती-पत्नीच्या उत्पन्नातील तफावत लक्षात घेता पत्नीला अंतरिम पोटगी देणे योग्य असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने दरमहा 10 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला.
पती-पत्नीच्या उत्पन्नातील तफावत लक्षात घेऊन पत्नीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, हे या आदेशातून स्पष्ट झाले आहे. अंतरिम पोटगी हा कायदेशीर हक्क असून, अंतिम निकालापर्यंत महिलेला आर्थिक आधार देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे.ॲड. भारती जागडे, पत्नीच्या वकील