Fake Police Pudhari
पुणे

Pune Fake Police Robbery: पुण्यात पोलिस असल्याची बतावणी करून १ कोटींच्या लुटीचा प्रयत्न; तिघांना अटक

सिंहगड रस्त्यावर व्यावसायिकाची कार अडवून रोख रक्कम हिसकावण्याचा प्रयत्न; नऱ्हे पोलिसांकडून तिघांना बेड्या, कटाच्या सूत्रधाराचा शोध सुरू

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सिंहगड रस्त्यावर भर दिवसा स्वतःला पोलिस असल्याचे सांगत एका व्यावसायिकाकडील तब्बल एक कोटी रुपयांची रोख रक्कम लुटण्याचा धक्कादायक प्रयत्न उघडकीस आला आहे. कार अडवून ‘तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात,’ अशी बतावणी करीत आरोपींनी रोख रक्कम असलेल्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी नऱ्हे पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्‍या आहेत. तर अन्य तीन जणांवर गुन्‍हा दाखल केला आहे. याप्रकरणी हर्षवर्धन भूषण पवार (वय ३५, रा. तळेगाव दाभाडे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम चाकणकर, अमेय कार्ले, गणेश कदम आणि त्‍यांचे दोन साथीदार यांच्‍यावर गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हर्षवर्धन पवार हे त्यांचे सहकारी किरण आपटे हे विक्रम चाकणकर याच्‍यामध्ये बसून नऱ्हे येथील एचडीएफसी बॅंकेच्‍या दिशेने नवले ब्रिजवरून जात होते. त्‍या वेळी अचानकपणे दुचाकीरून काही जण आले त्‍यांनी कारला त्‍यांच्‍या दुचाक्या आडव्या घातल्‍या. यावेळी अमेय कार्ले हा कारजवळ येऊन, "आम्ही पोलिस आहोत. तुम्ही दोन नंबरचा माल घेऊन चालला आहात, याची आम्हाला माहिती आहे," असे सांगत कारचे दरवाजे उघडण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी कारमधील हिरव्या रंगाची बॅग आणि आणखी एक बॅग ज्‍यात एकूण एक कोटी रुपये होते ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकार केल्याने आरोपींचा डाव फसला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

मुळात चाकणकर, अमेय कार्ले, गणेश कदम आणि बटर उर्फ गाडे या कटात सहभागी असल्‍याने. चाकणरने गाडी राजगड पोलिस ठाण्यात नेली. परंतु, राजगड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांना हा लुटीचा प्रकार असल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर तेथे चाकणकर आणि कार्ले यांना ताब्यात घेऊन त्‍यांनी नऱ्हे पोलिसांच्‍या हवाली केले. याप्रकरणी आता गुन्‍हा दाखल असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक घाडगे करत आहेत.

कटाचा सूत्रधार कोण ? चर्चांना उधाण

विक्रम चाकणकर याची व्यावसायिक पवार यांच्याशी पूर्वीपासून ओळख होती. पवार यांच्या आर्थिक व्यवहारांची त्याला सविस्तर माहिती होती. त्यातूनच इतर आरोपींशी संगनमत करून हा कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत लुटीचा प्रयत्न फसल्यानंतर चाकणकर पवार यांना राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घेऊन गेला. मात्र, चाकणकरने पवार यांना तेथे नेमके कोणाच्या सांगण्यावरून नेले, तसेच या चुकीच्‍या हालचालींची माहिती पोलिस निरीक्षक जाधव यांना कशी मिळाली, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. आरोपींना अखेरीस नऱ्हे पोलिसांच्या ताब्यात दिले असले, तरी या प्रकरणाबाबत विविध स्तरांवर चर्चांना उधाण आले आहे. काहीजणांकडून एका महिला पोलिस कर्मचाऱ्याचा आणि एका कथित पत्रकाराचा या प्रकरणाशी संबंध असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, या दाव्यांना अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तसेच, या दोघांनीच हे प्रकरण राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिटवता येईल, असा विश्वास आरोपींना दिला होता का, याचाही तपासातून खुलासा होणे अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT