Illegal Construction Action Pudhari
पुणे

Pune Encroachment Removal Drive: पुण्यात अतिक्रमणांवर दोन महिन्यांची धडक मोहीम; फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर

अडीच लाख दुकाने फ्रंट मार्जिनमध्ये सुरू असल्याचा आयुक्तांचा दावा; १०० एमएसएफ जवानांची नियुक्ती, लक्ष्मी रोडपासून पार्किंग तपासणी सुरू होणार

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील रस्ते, पदपथ आणि इमारतींच्या फ्रंट मार्जिनवर वर्षानुवर्षे फोफावलेल्या अतिक्रमणांचे समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे. केवळ पदपथांवरील हातगाड्या आणि किरकोळ अतिक्रमणे हटवून वाहतूक कोंडी सुटणार नाही, तर त्यामागील मूळ कारण असलेल्या फ्रंट मार्जिनमधील अनधिकृत बांधकामांवरच घाव घालण्यात येणार आहे. पुढील दोन महिन्यांत शहरभर टप्प्याटप्प्याने अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी दररोज कारवाई केली जाईल. सुटी किंवा सण असला तरी मोहिमेत खंड पडणार नाही, असे आयुक्त राम यांनी स्पष्ट केले.

शहरातील व्यावसायिक इमारतींच्या फ्रंट मार्जिनमध्ये ओटे बांधणे, रेलिंग आणि बॅरिकेड उभारणे, कॅनोपी, तसेच पोर्चचे कॉलम उभारणे अशा प्रकारांनी मोठ्या प्रमाणात जागा व्यापली आहे. प्रत्यक्षात या जागा वाहनांच्या हालचाली, अग्निशमन दलाच्या गाड्यांची ये-जा, भविष्यातील रस्ता रुंदीकरण आणि व्यावसायिक इमारतींमधील अभ्यागतांच्या पार्किंगसाठी मोकळ्या ठेवणे आवश्यक आहे. मात्र, त्यावर अतिक्रमणे झाल्याने वाहतुकीची कोंडी वाढत असून, रस्त्यांची उपलब्ध रुंदीही कमी होत आहे. पुण्यातील अडीच लाखांपर्यंत दुकाने फ्रंट मार्जिनमध्ये चालत असल्याची धक्कादायक माहिती आयुक्त राम यांनी दिली. त्यामुळे पुढील काळात अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राम यांनी सांगितले.

या कारवाईसाठी महापालिका १०० एमएसएफ जवानांची स्वतंत्र नियुक्ती करणार आहे. या जवानांचे काम केवळ अतिक्रमण हटवण्याचे असेल. त्यासंबंधीची फाइल मंजुरीसाठी सादर केली असून, मंजुरीनंतर जवान प्रत्यक्ष मोहिमेत सहभागी होतील. शहरातील सर्व भागांत दररोज कारवाई करण्याचे नियोजन आहे. अतिक्रमणविरोधी मोहिमेत प्रशासन कोणत्याही दबावाला झुकणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

पार्किंगच्या जागा हडपणाऱ्यांवरही होणार कारवाई

व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगच्या जागांमध्ये दुकाने, हॉटेल्स आणि अन्य व्यावसायिक वापर सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांची वाहने रस्त्यावर उभी राहत असून, वाहतूक कोंडी वाढत आहे. अशा जागांची तपासणी करून कारवाई केली जाणार आहे. याची सुरुवात लक्ष्मी रोडपासून करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. शहरातील मॉल आणि व्यावसायिक संकुलांमधील पार्किंगचीही तपासणी केली जाणार आहे.

शहरात येथे चालला बुलडोझर

महापालिकेच्या कारवाईचा बुलडोझर शहराच्या विविध भागांत फिरला. नगर रोड-वाघोली, येरवडा-वडगावशेरी परिसरातील जुना मुंढवा, पुणे स्टेशन पार्सल गेट आणि एअरपोर्ट रोडवर कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर-घोले रोड हद्दीत जंगली महाराज रस्ता, संभाजी उद्यान, एफ.सी. रोड, कुसाळकर चौक आणि बालभारती परिसरात अतिक्रमणे हटविण्यात आली. सिंहगड रोड-वारजे-कर्वेनगर भागात करिश्मा सोसायटी, सिटी प्राईड, शास्त्री कॉलनी, वडगाव पूल आणि दांडेकर पुलावर कारवाई झाली. हडपसर-मांजरी परिसरातील गोपाळपट्टी, मंत्री मार्केट, माळवाडी आणि ससाणेनगर, तर बिबवेवाडी-कसबा पेठ भागातील के. के. मार्केट, नाना पेठ, रामोशी गेट, टिंबर मार्केट आणि सेव्‍हन लव्हज चौकातही महापालिकेने अतिक्रमणे हटविली.

फ्रंट मार्जिनमध्ये काय करता येणार नाही?

इमारतीच्या आवश्यक फ्रंट मार्जिनमध्ये ओटा बांधणे, रेलिंग किंवा बॅरिकेड उभारणे, कॅनोपी बांधणे, तसेच पोर्चचे कॉलम उभारणे प्रतिबंधित आहे. रस्त्याच्या रुंदीनुसार फ्रंट मार्जिन सोडणे आवश्यक असून, २४ मीटरपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींच्या बाजूला आणि मागील बाजूस अग्निशमन वाहनांच्या हालचालीसाठी सहा मीटरचे सामासिक अंतर आवश्यक आहे. या जागांमध्ये अतिक्रमण झाल्यास अग्निशमन दलाच्या बचावकार्यात अडथळे निर्माण होऊ शकतात.

अतिक्रमणांना ९० टक्के प्रशासन जबाबदार

शहरातील अतिक्रमणांसाठी ९० टक्के प्रशासन आणि १० टक्के नागरिक जबाबदार असल्याचे सांगत आयुक्त राम म्हणाले, की प्रशासनाने वेळेत कारवाई केली असती, तर अतिक्रमणांना एवढे मोठे स्वरूप आले नसते. त्यामुळे आता प्रशासन स्वतःची जबाबदारी ओळखून कठोर पावले उचलणार आहे. शहराचे सौंदर्य वाढवणे, पादचाऱ्यांना सुरक्षितपणे चालता येणे आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करणे, या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात येत आहे.

शहरात एक इंचही फ्रंट मार्जिन अतिक्रमित राहता कामा नये, असा आमचा ठाम निर्धार आहे. अतिक्रमण करणारी व्यक्ती लहान असो वा मोठी, गरीब असो वा श्रीमंत, कोणालाही अभय दिले जाणार नाही. कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्यांचे नाव आणि फोटो जाहीर करण्यासही मी मागेपुढे पाहणार नाही. त्याचे परिणाम भोगण्याची माझी तयारी आहे.
नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT