Mayor Manjusha Nagpure Pudhari
पुणे

Pune Encroachment Drive: ‘प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांना अतिक्रमणे दिसली नाहीत का?’; महापौर मंजूषा नागपुरेंचा सवाल

पुण्यातील अतिक्रमणविरोधी कारवाईचे महापौरांकडून समर्थन; नगरसेवकांच्या अतिक्रमणांवरही कारवाई होणार, कोणालाही अभय नाही

पुढारी वृत्तसेवा

पुणे: शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न वर्षानुवर्षे कायम असताना प्रशासकीय राजवटीत अधिकाऱ्यांना ही अतिक्रमणे दिसली नाहीत का? असा थेट सवाल महापौर मंजूषा नागपुरे यांनी उपस्थित केला आहे.

शहरातील अतिक्रमणांविरोधात सुरू असलेल्या धडक कारवाईचे समर्थन करताना सत्ताधारी नगरसेवकांनी सभागृहात आवाज उठविल्यामुळेच प्रशासनाला जाग आली आणि शहरातील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम वेगाने सुरू झाली, असा दावा त्यांनी केला. आमच्यामुळेच आज शहर स्वच्छ आणि मोकळे होत असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनाच्या मागील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

पुण्यात महापालिकेने अतिक्रमणविरोधात जोरदार कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत नगरसेवकांच्या अतिक्रमणांना अभय दिला जात असल्याचा आरोप होत असल्याच्या प्रश्नावर वरील उत्तर महापौर नागपुरे यांनी माध्यमांना दिले. नागपुरे म्हणाल्या की, शहरातील अतिक्रमणांचा प्रश्न गंभीर बनला असून, नागरिक आणि नगरसेवकांकडून वारंवार तक्रारी करूनही त्यावर प्रभावी कारवाई होत नव्हती. प्रशासकांच्या काळातही शहरात अतिक्रमणे वाढत होती. मात्र, त्या वेळी त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही अतिक्रमणे आली नव्हती का? लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच हा प्रश्न चिघळला.

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांचा मुद्दा सर्वसाधारण सभेत उपस्थित झाल्यानंतर नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने शहरभर अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली. केवळ पथारी, हातगाड्या किंवा रस्त्यावरील तात्पुरत्या अतिक्रमणांपुरती कारवाई मर्यादित न ठेवता इमारतींच्या फ्रंट मार्जिन आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमणांवरही हातोडा चालविला जात आहे. या कारवाईचे पुणेकरांनी स्वागत केले आहे. त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे. याबद्दल आम्ही त्यांच्याबद्दल आभारी आहोत. पुण्यात रस्त्यावर कचरा नको, लोकांना रस्त्यावरून चालायला जागा असायला हवी, त्यामुळे ही कारवाई महत्त्वाची आहे.

या कारवाईत कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. नगरसेवक असो की कोणीही असो कारवाई होणार. आमच्या कोणत्याच नगरसेवकांनी किंवा लोकप्रतिनिधींनी याला विरोध केला नाही. सर्वपक्षीय नगरसेवक याचे स्वागत करीत आहेत. जर कोण्या नगरसेवकाचे अतिक्रमण असेल तर त्यावर थेट कारवाई केली जाईल. कोणतेही अतिक्रमण ठेवले जाणार नाही. अतिक्रमण काढले, तरच पुणेकरांचे जगणे सुसह्य होणार आहे. अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कारवाई व्हावी; परंतु अधिकृत बाबींना विनाकारण लक्ष्य करू नये, यात पूर्णपणे पारदर्शकता ठेवून कारवाई व्हायला हवी, असे महापौर म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT