Music Concert Pudhari
पुणे

Pune music concerts: पुणे ठरतेय म्युझिक कॉन्सर्टचे शहर

अनेक सेलिबिटी कलाकारांचे होतेय सादरीकरण

पुढारी वृत्तसेवा

पुणे: पुणे शहराची ओळख आता फक्त शिक्षणनगरी किंवा सांस्कृतिक राजधानी अशी मर्यादित राहिलेली नाही, तर पुणे हे आता ‌‘म्युझिक कॉन्सर्टचे शहर‌’ म्हणूनही ओळखले जात आहे. रंगबिरंगी रोषणाई, सेलिबिटी कलाकारांचे सुरेल सादरीकरण अन्‌‍ त्यावर थिरकणारी तरुणाई असे चित्र कॉन्सर्टसमध्ये दिसत असून, ए. आर. रहमान यांच्यापासून ते अरजित सिंग यांच्यापर्यंत अशा विविध कलाकारांच्या कला सादरीकरणाची पर्वणी तरुणाईला अनुभवयाला मिळत आहे आणि पुण्यातील प्रत्येक कॉन्सर्ट हा तरुणाईसाठी एक ‌‘म्युझिकल फेस्टिव्हल‌’ ठरत आहे.

दर महिन्याला अंदाजे 10 कॉन्सर्ट आयोजित होत असून, 30 ते 45 संस्था, इव्हेंट कंपन्या या सांगीतिक कार्यक्रमांची धुरा सांभाळत आहेत. बाणेर, कोरेगाव पार्क, विमाननगर, कल्याणीनगर, हडपसर अशा विविध भागांतील मैदाने, मॉल्स आणि क्लबमध्ये अशा विविध ठिकाणी लाईव्ह म्युझिकचा हा जल्लोष रंगत आहे. विशेष म्हणजे केवळ पुणेकर तरुणाईच नव्हे, तर राज्यभरातील तरुणाई ‌‘वीकेंड प्लॅन‌’ म्हणून पुण्यातील कॉन्सर्टला येत आहे.

सुफी, बॉलिवूड, रॅप, रॉक, गझल यांसह विविध प्रादेशिक भाषेतील संगीताचे प्रत्येक रंग येथे अनुभवायला मिळत आहेत. वीकेंडला कॉन्सर्टला जाणे हा तरुणाईचा नवा ट्रेंड बनला आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. साऊंड, लाईटिंग, रंगमंच व्यवस्थापन, सुरक्षा, जाहिरात आणि प्रसिद्धी अशा विविध क्षेत्रांमधील अनेकांना काम मिळत आहे.

याविषयी ‌‘इव्हेंट ॲण्ड एंटरटेन्मेंट मॅनेजमेंट असोसिएशन‌’चे (इमा) सदस्य निखिल कटारिया म्हणाले, ‌‘जगभरात म्युझिक कॉन्सर्ट होतातच. महाराष्ट्रात मुंबईनंतर आता पुण्यात हा ट्रेंड वाढला आहे. बॉलिवूडमधील संगीत जगतातील कलाकारांचे कार्यक्रम होत आहेतच. आता तर विविध देशांमधील कलाकारही कला सादरीकरणासाठी येत आहेत. अशा कॉन्सर्टसचे नियोजन इव्हेंट कंपनींकडे असते. सुफी, बॉलिवुड, रिमेक्स, रोमँटिक, रॅप, शास्त्रीय संगीत, रॉक म्युझिक बॅण्ड... अशा विविध प्रकारच्या संगीतांवर हे कॉन्सर्ट आधारित आहेत.‌’

कॉन्सर्ट एक; मात्र त्याची तयारी प्रचंड

  • 2 ते 3 महिन्यांपूर्वीपासून नियोजन सुरू

  • कॉन्सर्टच्या व्यवस्थापनासाठी सुमारे 300 जणांची टीम कार्यरत

  • पोलिस, महापालिका आणि इतर विभागांच्या परवानग्या अनिवार्य

  • एका कॉन्सर्टसाठी अंदाजे 8 कोटींहून अधिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT