पुणे : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या सोशल मीडियावरील प्रचारावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. यासाठी 17 माध्यम कक्ष निरीक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांचे विशेष लक्ष या बाबींकडे राहणार आहे.
जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित तहसीलदार हे या समितीचे सदस्य आहेत, तर जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. जिल्ह्यातील सर्व कक्ष अधिकाऱ्यांना पुणे जिल्हा माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव युवराज पाटील यांनी कक्ष अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
उमेदवारांच्या सोशल मीडिया खात्यांवर कसे लक्ष ठेवायचे, जाहिरात व प्रचारातील भाषा कशी तपासायची इत्यादी कामांची माहिती या प्रशिक्षणात देण्यात आली. निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडियाचा गैरवापर रोखणे, मतदारांना दिशाभूल होऊ न देणे आणि जाहिरातींमधील आचारसंहितेचे पालन होते की नाही, हे कक्ष अधिकारी तपासणार आहेत, तसेच उमेदवारांना कोणतीही निवडणूकविषयक जाहिरात माध्यमांवर प्रसारित करण्यापूर्वी पूर्वप्रमाणन घेणे अनिवार्य असणार आहे.
धर्म, जात, भाषा, लिंग किंवा पेहरावावर आधारित द्वेष निर्माण करणारा प्रचार करता येणार नाही. जाहीरात राजकीय पक्षाने केल्यास ती पक्षाच्या निवडणूक खर्चात नोंदवली जाईल; उमेदवाराने केल्यास ती उमेदवाराच्या खात्यात दाखवणे बंधनकारक राहील. सोशल मीडियावरील वैयक्तिक मते जाहिरात समजली जाणार नाहीत; मात्र आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या लेखी परवानगीशिवाय प्रचार केल्यास ती जाहिरात ठरेल आणि तिच्यासाठी प्रमाणन आवश्यक राहणार आहे.