सुनील माळी
घडीत असं वाटतंय...
काय, कसंय निवडणुकीचं वातावरण ?
अहो, कसलं वातावरण अन् कसलं काय!
का हो?
काही कळंना झालयं हो... घडीत एक वाटतंय, तर घडीत दुसरं वाटतंय...
म्हंजे काय? जरा विस्कटून सांगा ना
घडीत देवाभाऊ येतो अन् सांगतो, पुण्याचा विकास आम्हीच करणार... कितीतरी हजार कोटी खरचणार आहे म्हणे पुण्यात. तेव्हा घडीत वाटतं देवाभाऊच्याच मागनं जावं...
मग जा की. कुणी अडवलयं ?
अहो, देवाभाऊ गेल्यावर थोड्या वेळानं दादा येतात. ते म्हणतात, जरा शेजारच्या पिंपरीकडं बघा. कसे रस्ते केलेत मी. मोठमोठे रस्ते... झालंच तर ग््रेाड सेपरेटर, पूल. कुठं ट्रॅफिक जाम नाही की काही नाही... अन् तुमच्या पुण्यात? बारकुडे रस्ते, गाड्यांची गर्दी, ट्रॅफिक जाम, खड्डे. म्हंजे नुसताच वैताग. करू का तुमचं पुणं तसं? मग माझ्या मागनं या... दादांचं असं बोलणं ऐकलं की घडीत वाटतं जावं त्यांच्याच मागनं
मग जा की. कुणी अडवलंय ?
असं कसं? मग पुन्हा देवाभाऊ येतात अन् म्हणतात, जमिनीवरचे रस्ते काय घेऊन बसलात तुम्ही पुणेकर? मी तुमच्यासाठी पाताळलोक बांधतोय. पाताळात रस्ते खोदतोय. कुठं ट्रॅफिक जाम नाही, की कुठं पथारीवाल्यांचं-स्टॉलवाल्यांचं अतिक्रमण नाही. झालंच तर प्रदूषणही नाही. सरळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं अन् जमिनीच्या पोटातनं वर यायचं... त्यामुळं पुन्हा घडीत वाटतं की...
काय वाटतं ?
पुन्हा घडीत वाटतं की जावं देवाभाऊकडंच...
मग जा की कुणी अडवलंय ?
जातंच होतो शेवटी, पण कोपऱ्यावरच दादाची सभा ऐकल्यावर थांबलो अन् बुचकुळ्यात पडलो.
आता काय झालं बुचकुळ्यात पडायला?
दादा सांगत होते आपल्या बारामतीची कहाणी. बारामतीत फिरलं म्हणजे परदेशातच फिरल्यागत वाटतंय... रिंग रोड म्हणू नका, मोठाले रोड म्हणू नका. तेवढंच नाही तर शिक्षणसंस्था अशा टॉप क्लासच्या आहेत, की आता बाहेरनं मुलं येतील शिकायला... बारामतीसारखंच पुणं करू म्हणाले... त्यांचं ऐकून घडीत वाटलं की... दादांच्या पार्टीचंच बटण दाबावं...
मग दाबा की... कुणी अडवलंय ?
दाबलं असतं हो..., पण पुण्यात दादा आले तरी मुंबई अन् दिल्लीत देवाभाऊचाच पक्ष आहे ना? पुणेकरांनी कॉर्पोरेशनमधून आपल्याला बाहेर काढल्याचा राग म्हणून देवाभाऊंच्या पक्षानं मुंबई-दिल्लीची रसदच बंद केली तर? मेट्रो गेल्या वर्षी आली एकदाची. मी राहतो वडगाव शेरीला. तिथं मेट्रोत बसलं की फटाककन मी कुठंही जाऊ शकतो. वाटलं तर पिंपरी गाठू शकतो, वाटलं तर पौड फाटा, अन् वाटलं तर स्वारगेटला उतरू शकतो. आता तर मेट्रोचं जाळंच होणार आहे की पुण्यात. मग काय? मी अर्ध्या-पाऊण तासात कुठनंही कुठंही टच होऊ शकणार आहे. आता मेट्रो कोण करतं तुम्ही सांगा? दिल्लीचंच सरकार ना? मग पुण्याची पालिका आपल्याकडं नसेल तर त्या सरकारनं खळखळ केली मेट्रोला तर मग? त्यात काल-परवाच देवाभाऊ म्हणालेत, ‘खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा...’ म्हणजे दादांकडं पालिका गेली तर तिच्या खिशात आणेच राहणार नाहीत... मग आपल्याला केवढ्यात जाईल ते?... त्यामुळं घडीत वाटतं... घडीत वाटतं की कशाला कॉर्पोरेशनमधली पार्टी बदलायच्या भानगडीत पडायचं? राहू दे ना देवाभाऊच्या पार्टीला...
मग? ठीक आहे की तुमचा डिसिजन?
पण मग दादांनी त्याला दिलेलं उत्तर तुम्ही ऐकलं का?
काय म्हणाले असं दादा?
दादा म्हणाले, हो... आहेच मी बाजीराव, पण दुसरा बाजीराव नाही, तर पहिला बाजीराव. कर्तबगार. मराठा सामाज्य स्वतः कर्तृत्वानं वाढवणारा. त्यामुळं मी माझ्या कर्तबगारीवर पुण्याचं नाव बाजीरावाप्रमाणंच दिल्लीत पोचवीन... त्यांचं ते वीरश्रीचं बोलणं ऐकलं अन् आपली तर छातीच फुगली... मग घडीत वाटू लागलं की दादाच खरे...
बसा तुम्ही देवाभाऊ की दादा करत. तुम्ही काही तुमचा निर्णय घेणार नाही पक्का..., मी चाललो.
अहो, थांबा, थांबा जरा, घोडं बांधा बांधा जरा. झालाच माझा निर्णय
अरे वा, काय झाला? अन् कसा झाला ?
माझा निर्णय झाला. तो काय झाला ते सांगतो, पण आधी तो कसा झाला ते सांगतो.
कसा झाला?
देवाभाऊंनी माझा संभम संपवला. ते म्हणाले, हे आमचे वाद निवडणुकीपुरतेच आहेत. निवडणुकीच्या आधीच आमचं ठरलं होतं, की दोस्तीत खेळायचं. खरंखरं भांडायचं नाही. देवाभाऊंचं ते म्हणणं ऐकलं अन् पिक्चरमध्ये हीरो जसा व्हिलनला खोटंखोटं मारतो, ढिशुम...ढिशुम तसंच वाटायला लागलं मला. मग पुढं देवाभाऊ म्हणाले, इलेक्शननंतर आमच्या युतीचेच महापौर होणार आहेत राज्यभरात... त्यांच्या या बोलण्यानं मग मला समजलं की इलेक्शननंतर आता भांडताना दिसणारे देवाभाऊ-दादा एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारेत. मग कशाला आपण एकाच बाजूला जायचं... म्हणून मी ठरवलं...
काय ठरवलं?
मी ठरवलंय आता की कुणालाच नाखूश करायचं नाही... टीव्हीवरच्या जाहिरातीत नाही का तो अंपायर म्हणतो... फिफ्टी-फिफ्टी... तसंच करून टाकूया झालं... चला जाऊया, उद्याच्या व्होटिंगची स्लीपच मला शिंची मिळाली नाही अजून. माझं नाव कुठल्या बूथला आलंय ते पाहायचंय... रामराम...