पुणे: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पडताळणीच्या कामात हलगर्जीपणा केल्याने दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कामात सहभागी होण्याचे आदेश देऊनही सहभागी न झाल्याने त्यांना यापूर्वी ’कारणे दाखवा’ नोटीस बजाविण्यात आली होती. मात्र, त्यालाही प्रतिसाद न दिल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक अनिल गायकवाड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शहनाबाज युनुस शेख (शिक्षक) व प्रताप पाटील (लिपिक, सार्वजनिक बांधकाम विभाग) यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आगामी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाबाबत सध्याच्या मतदारांची 2002 च्या मतदार यादीशी पडताळणी (मॅपिंग) करण्यात येत आहे. तसेच, मतदारांच्या तपशिलातील (नाव, लिंग, वय, फोटो, पत्ता) आवश्यक दुरुस्त्या करण्याची कार्यवाही सुरू आहे. या कामाचा नियमित आढावा घेण्यासाठी केंद्रस्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
मात्र, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील यादी भाग क्र. 228 चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सध्या उर्दू मुलांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शहानबाज शेख आणि यादी भाग क्र. 230 चे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व सध्या सार्वजनिक बांधकाम विद्युत भागात लिपिक म्हणून कार्यरत असलेले प्रताप पाटील हे काम करीत नसल्याचे निदर्शनास आले होते.
त्यांना याबाबत वारंवार ‘कारणे दाखवा’ नोटीस देऊनही कामात सहभागी न झाल्याने उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुनंदा भोसले यांनी गायकवाड यांना गुन्हा नोंदविण्याचे निर्देश दिले.