पुणे: दरवर्षी पुराचा फटका बसणाऱ्या सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवूनही त्यावर कोणताही निर्णय झालेला नसल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली. पुनर्वसनाबाबत सर्व नागरिकांची भूमिका स्पष्ट झाल्यानंतरच नगरविकास विभागाकडे पुढील पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सध्याच्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नदीकाठच्या भागात सतर्कतेचा इशारा देत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना केल्याचेही त्यांनी सांगितले. महापौरांनी सांगितले की, खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होताच नदीकाठच्या नागरिकांना सकाळपासून ध्वनिक्षेपकाद्वारे वारंवार सतर्क करण्यात आले. मोबाईलवर अलर्ट संदेशही पाठविण्यात आले असून, पाणी घरात शिरण्यापूर्वी सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले.
पूरग्रस्त नागरिकांसाठी बॅडमिंटन हॉल, वांगडे जलतरण तलाव परिसरातील हॉल आणि सनसिटी भाजी मंडई येथे तात्पुरत्या निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी ४०० नागरिकांच्या राहण्याची, भोजनाची आणि आवश्यक सुविधांची व्यवस्था केली असून, अग्निशमन दल, फ्लड लाईट्स आणि इतर आपत्कालीन यंत्रणाही पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
एकतानगरमध्ये दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असल्याने क्लस्टर पुनर्वसन हाच या समस्येवरील कायमस्वरूपी उपाय असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. मात्र, पुनर्वसनाबाबत काही नागरिक सकारात्मक आहेत, तर काहींचा विरोध आहे. त्यामुळे प्रथम नागरिकांचे मत जाणून घेतले जाईल. त्यानंतरच राज्य सरकारकडे विशेष प्रस्तावाचा पाठपुरावा करून अंतिम निर्णयासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सीमाभिंत उभारल्याने पाण्याचा वेग काही प्रमाणात कमी होऊ शकतो; मात्र त्यामुळे पूराचा प्रश्न पूर्णपणे सुटणार नाही. त्यामुळे दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय म्हणून पुनर्वसनालाच प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. रिव्हर फ्रंट प्रकल्पाबाबत बोलताना महापौरांनी सांगितले की, पर्यावरणीय परवानग्या, न्यायालयीन प्रक्रिया तसेच नदीची वहनक्षमता कायम राखण्याच्या निकषांमुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब होत आहे. प्रकल्पाला तत्त्वतः विरोध नसून पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन व्हावे, अशी काही संस्थांची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.