Dasara Celebration Pudhari
पुणे

Pune Dussehra Celebration: पुणेकरांचा दसरा उत्साहात; सोने, वाहन खरेदीसह नव्या कार्यांचा शुभारंभ

आपट्याची पाने देत शुभेच्छांची देवाणघेवाण; मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम, विविध भागांत रावणदहनाचे आयोजन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: आपट्याची पाने देत शुभेच्छांची देवाणघेवाण, घराघरांत पूजा-अर्चा, नव्या संकल्पनांची आणि कार्याची सुरुवात, अशा उत्साही वातावरणात विजयादशमी अर्थात दसरा मंगळवारी (दि. २०) साजरा होणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या सणानिमित्त वाहन, सोने आणि गृहखरेदीसह नवीन कार्याची सुरुवातही करण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा, विधिवत पूजाअर्चा, पंचपक्वान्नांचा बेत आणि आपट्याची पाने देत शुभेच्छांची देवाणघेवाण यामुळे घराघरांत सणाचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.

एकमेकांमधील कटुता विसरून स्नेह वाढवणे, सुख-समृद्धीची कामना करणे आणि विजयाचा संकल्प करण्यासह पारंपरिक पद्धतीने सणाचा आनंद लुटला जाणार आहे. शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम आणि सीमोल्लंघनाच्या मिरवणुका निघणार असून, विविध भागांत रावणदहनाचे कार्यक्रमही होणार आहेत.

दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन कार्याला सुरुवात करणे शुभ मानले जाते. त्यामुळे यंदाही सोने, वाहने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गृहखरेदीसह नव्या योजनांची सुरुवात केली जाणार आहे. घरे आणि कार्यालयांमध्ये रांगोळीच्या पायघड्या, झेंडूच्या फुलांची तोरणे आणि विद्युत रोषणाईने मंगलमय वातावरण असणार आहे.

कुटुंबातील सर्व जण एकत्र येऊन देवी-देवतांची पूजा करतील. घरात धनसंपन्नता, यश, कीर्ती आणि एकोपा नांदावा, यासाठी प्रार्थना केली जाणार आहे. घरातील तसेच कार्यालयांतील मौल्यवान वस्तू, शस्त्रे आणि वाहनांचे विधिवत पूजन करण्यात येईल. काही मंदिरांतून सीमोल्लंघनाच्या मिरवणुका निघणार आहेत.

भाविकांना दर्शनासाठी मंदिरे दिवसभर खुली राहणार आहेत. याशिवाय मध्यवर्ती पेठांसह नवी पेठ, खडकी, कॅम्प आणि छत्रपती शिवाजीनगर परिसरात रावणदहनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेत. आपट्याची पाने देऊन एकमेकांना शुभेच्छा देण्याची परंपरा जपत नात्यांमधील गोडवा वाढविला जाणार आहे. परंपरा आणि आनंदाची सांगड घालत पुणेकर दसरा उत्साहात साजरा करणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT