पुणे: मला लायटर का मागितले, म्हणताच मद्यधुंद महिलेने शिवीगाळ करत महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या गालावर चापट मारल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ययाती मोतीगीर बामणे (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी शीतल सुधाकर मोरे (वय ४८, रा. नोबल हॉस्पिटल जवळ, हडपसर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना १८ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास कोरेगाव पार्कमधील लेन क्रमांक ७ येथील अॅनिस हॉटेलजवळ घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, बामणे या कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.
रात्री गस्तीवर असताना वाहतूक कोंडी झाल्याने त्यांनी सीआर मोबाइल वाहन बाजूला लावले होते. त्या वेळी आरोपी महिला तेथे आली. विनाकारण शिवीगाळ करून लायटर मागितले. फिर्यादी यांनी मला तू कसे काय लायटर मागितले, अशी विचारणा केली असता आरोपीने पुन्हा शिवीगाळ करत त्यांच्या गालावर चापट मारली आणि गोंधळ घातला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोरे पुढील तपास करीत आहेत.