पुणे

Pune Drugs Case : डॉ. देवकातेंनंतर आता डॉ. ठाकूर रडारवर?

Laxman Dhenge
पुणे : पुढारी वृत्तसेवा : ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात डॉ. प्रवीण देवकाते यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. डॉ. संजीव ठाकूर यांच्या सांगण्यावरूनच ललित पाटीलला आपल्या युनिटला अ‍ॅडमिट करून घेतल्याचा खुलासा यापूर्वी डॉ. देवकाते यांनी केला होता. त्यामुळे देवकातेंच्या अटकेनंतर आता डॉ. ठाकूर पोलिसांच्या रडारवर येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यावर ससून रुग्णालय प्रशासनावर सर्व स्तरांमधून ताशेरे ओढण्यात आले. वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. संजीव ठाकूर यांचा पदभार काढून घेतला, तर डॉ. प्रवीण देवकाते यांना निलंबित केले.
ललित पाटील डॉ. देवकाते यांच्या युनिटमध्ये उपचार घेत होता. मात्र, पाटीलला माझ्या मर्जीने नव्हे, तर डॉ. ठाकूर यांच्या आदेशानुसार ऑर्थोपेडिक युनिटला दाखल करून घेतल्याचे आणि आपल्याला निलंबित करून अन्याय झाल्याचे डॉ. देवकाते यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते.डॉ. देवकाते यांना पोलिसांनी अटक केल्यावर ससूनमधील संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देवकाते यांच्याकडून 'आतली' माहिती उघड होणार असल्याची चर्चा आहे. मंगळवारी देवकाते यांच्यासह आणखी दोन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. ललित पाटीलवर उपचार करणा-या इतर डॉक्टरांवरही आता टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

कसा घडला घटनाक्रम

ललित पाटील 4 जून रोजी क्षयरोगाचा संशयित रुग्ण असल्याच्या कारणावरून ससून रुग्णालयात दाखल झाला. त्यानंतर चारच दिवसांमध्ये त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला आणि 7 जून रोजी पथकप्रमुख डॉ. प्रवीण देवकाते यांच्या युनिटअंतर्गत दाखल करून घेण्यात आले. त्यानंतर तीन महिने तो याच पथकाकडून उपचार घेत होता. पळून जाण्याच्या एक महिना आधी म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी बेरियाट्रिक सर्जरी करण्याच्या उद्देशाने त्याला डॉ. संजीव ठाकूर यांच्या युनिटमध्ये हलवण्यात आले होते.

कारवाई अधिवेशनापूर्वी की नंतर?

डॉ. संजीव ठाकूर यांचा अधिष्ठातापदाचा कार्यभार काढून घेण्यात आला असला तरी त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारपासून सुरू होत आहे. यामध्ये ससून प्रकरणाबाबत आमदारांकडून प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. ललित पाटील प्रकरणामध्ये काही नेत्यांची नावे याआधीच चर्चेत आली आहेत. यावरून विरोधकांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जाणार आहे. ही सर्व पार्श्वभूमी पाहता, अधिवेशनाच्या समारोपानंतर डॉ. ठाकूर यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या ललित पाटीलला विनय अर्‍हाना याच्या सांगण्यावरून दत्तात्रय ढोके याने दहा हजार रुपये रोख देऊन मोबाइल फोन दिला. भूषण हा भाऊ ललित आणि अभिषेक बलकवडे या दोघांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले. रुग्णालयातून पळाल्यानंतर ललित हा अर्चना निकम हिच्या नाशिक येथील निवासस्थानी थांबला होता. यादरम्यान, प्रज्ञा कांबळे ही दूरध्वनीवरून त्याच्या संपर्कात होती. यावेळी, तिने ललित यास मोठी रक्कम दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने याप्रकरणातील 14 पैकी या सहा आरोपींविरुद्ध प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
केले आहे.

दत्तात्रय ढोके (वय 40, रा. हडपसर), अर्चना निकम (वय 33), प्रज्ञा कांबळे (वय 39), भूषण पाटील (वय 34), अभिषेक बलकवडे (वय 31, सर्व रा. नाशिक), रोझरी एज्युकेशन ग्रुपचा भागीदार विनय अर्‍हाना (वय 50, रा. कॅम्प) यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. अन्य आठ आरोपींचा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 173 (8) अन्वये तपास सुरू ठेवण्यात येणार असून, तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या गुन्ह्यात सहा आरोपींचा सहभाग असल्याचे दाखवण्यासाठी आम्ही कट रचण्याचे पुरावे आणि डिजिटल

पुरावे गोळा केले आहेत. सरकारी वकील, तपास अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त यांच्या छाननी समितीने पळून जाण्याच्या प्रकरणातील पुराव्यांची छाननी केली. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातील कैदी वॉर्डमधून पळून गेला होता. साकीनाका पोलिसांनी पाटील याला बंगळुरूपासून 100 किलोमीटर अंतरावरील एका भोजनालयातून 17 ऑक्टोबर रोजी पुन्हा अटक केली. पाटील याला तळोजा कारागृहातून 31 ऑक्टोबर रोजी पुणे ड्रग प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर पाटील रुग्णालयातून पळून जाण्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT