पुणे: राजस्थानी तस्करांनी गेल्या काही वर्षांत पुण्यातील अमली पदार्थतस्करीत आपला चांगलाच अंमल निर्माण केल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने मेफेड्रॉन (एमडी), गांजा व अफीमच्या तस्करीत हे तस्कर आघाडीवर आहेत. ट्रक, कार किंवा कुरिअरद्वारे अमली पदार्थ लपवून पुण्यात आणले जातात. त्यानंतर विविध व्यवसायांच्या आडून त्या अमली पदार्थांची विक्री केली जाते. पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे राजस्थानातून पुण्यात होणारी अमली पदार्थांची तस्करी चिंतेची बाब आहे.
फेबुवारी महिन्यात खराडी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे पोलिसांनी तीन कोटी 92 लाख रुपये किमतीचे एक हजार 960 ग््रॉम मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले होते. या कारवाईत सात जणांना अटक केली होती. मात्र, त्यातील बहुतांश आरोपी राजस्थानातील जोधपूर, बालोतरा परिसरातील होते.
पोलिसांनी पाच पथके तयार करून थेट राजस्थानात छापे टाकून अनेकांची धरपकड केली होती. विशेष म्हणजे, काही आरोपी पुण्यात गिफ्ट शॉप्स, किराणा दुकाने चालवत दिवसा सामान्य व्यावसायिकाचा आव आणून अमली पदार्थ विक्रीचा काळाबाजार करीत होते. हे आरोपी राजस्थानातून एमडीची पुण्यात तस्करी करून वाघोली, मांजरी, खराडी परिसरात विकत असल्याचे चौकशीत पुढे आले होते.
ॲपच्या माध्यमातून ड्रग विक्रीचे जाळे
पोलिसांना तस्करीचा सुगावा लागू नये म्हणून राजस्थानी तस्करांनी मोबाईल क्रमांकाशिवाय चालणाऱ्या ॲपच्या माध्यमातून ड्रग विक्रीचे जाळे तयार केले होते. तब्बल 23 दिवस गुप्तपणे पाळत ठेवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केले. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात कारवाई करीत तब्बल 19 आरोपींना अटक केली.
त्यामध्ये सहाज ण राजस्थानातील आहेत. आरोपी तस्कर सुरुवातीला व्हॉट्सॲप ग््रुापद्वारे संपर्क साधत होते. मात्र, पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी त्यांनी नंतर टेलिग््रााम, सिग्नल आणि इतर ॲपचा वापर सुरू केला. या ॲपमध्ये मोबाईल नंबरची आवश्यकता नसून केवळ युजर आयडीवरून संवाद साधला जात होता. मात्र, पोलिसांना याबाबत सुगावा लागला अन् त्यांनी हे जाळे उद्ध्वस्त केले.