

पुणे: शहरातील कमाल तापमानात मोठी वाढ झाली असून, कमाल आणि किमान तापमानात दुप्पटीने दरी वाढली आहे. पारा सलग दुसऱ्या सोमवारी 43 अंशांवर गेला होता. त्यामुळे नागरिक दिवसभर घामाघूम झाले होते. प्रामुख्याने रस्त्यावर काम करणारे कामगार, भाजी, फळविक्रेते उकाड्याने त्रस्त झालेले दिसत होते. रात्रीच्या तापमानातही वाढ झाल्याने पुणेकरांची झोप उडवणारा हा उन्हाळा ठरत आहे.
शहरातील तापमानात गत आठ ते दहा वर्षात मोठे बदल झाले असून, 2020 पासून मार्च, एप्रिल आणि मेमध्ये तापमानाचे नवे विक्रम होत आहेत. रविवारी यंदाच्या हंगामात प्रथमच पारा 43 अंशांवर गेला, तर सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पारा 43 अंशांवर स्थिर होता. त्यामुळे नागरिक उष्णतेने हैराण झाले होते. शहरातील सर्वच प्रमुख भागातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झालेली दिसत होती.
शहरातील हॉटस्पॉट...
कोरेगाव पार्क, लोहगाव: 43
शिवाजीनगर, पाषाण: 41
चिंचवड, लवळे: 40
देशात राजस्थानातील चुरू, उत्तर प्रदेशातील लखनौ, बिहारमधील पाटना येथे 43 ते 44 अंशांवर तापमान आहे.
राज्याच्या तुलनेत पुणे कुठे?
अकोला, अमरावती 46.6
नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा 45
पुणे (लोहगाव, कोरेगाव), परभणी, छ. संभाजीनगर, सोलापूर: 43
रात्रीच्या तापमानात वाढ...
कमाल-किमानमध्ये दरी निर्माण झाली असली, तरी किमान तापमान हे 22 ते 24 वरून 26 अंशांवर गेले आहे. त्यामुळे रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. सन 2020 पर्यंत पुणे शहर सायंकाळी 6 नंतर थंड होत असे. आता मात्र रात्रभर उकाडा जाणत आहे. त्यामुळे पंखे, कुलर आणि वातानुकूलित यंत्रणा 24 तास सुरू ठेवावी लागत आहे. हा मोठा फरक गत सहा वर्षांत झाला आहे.