Pune Crime pudhari photo
पुणे

Pune Crime: चारवेळा दृष्यम पाहिला.. पत्नीला भट्टीत टाकून फिल्मी स्टाईलनं मर्डर.. मात्र मेकॅनिक 'असा' अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Anirudha Sankpal

Pune Crime News Drishyam Style Murder:

पुण्यात फिल्मी स्टाईलनं पत्नीचा खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हत्येसाठी दृष्यम या हिंदी चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचं पोलीस तपासात उघड झालं. या प्रकरणी वारजे मालवाडी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. ही घटना गेल्या महिन्यातील असून आरोपीनं पत्नीचा खून करून तिचा मृतदेह भट्टीत टाकला होता आणि त्यानंतर पोलीस स्टेशनच्या सतत चकरा मारल्या होत्या. एवढंच काय पत्नीचं दुसऱ्या पुरूषासोबत अफेअर असल्याचं भासवण्यासाठी आरोपीनं मेसेज देखील पाठवल्याचं पोलीस तपासात आढळून आलं आहे. मात्र चाणाक्ष पोलिसांसमोर या दृष्यम स्टाईल मर्डररची डाळ काही शिजली नाही.

नेमकं काय झालं?

समीर जाधव हा अटोमोबाईल डिप्लोमा हॉल्डर असलेला व्यक्ती गॅरेज चालवत होता. त्याची ३८ वर्षाची पत्नी अंजली समीर जाधव ही एका खासगी शाळेत शिक्षिका होती. या दोघांचे २०१७ मध्ये लग्न झालं होतं. ते पुण्यातील शिवने भागात राहत होती. त्यांना दोन मुलं देखील आहेत. एक तिसरीत तर दुसरा पाचवीत शिकतोय.

दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी समीर जाधव भाड्यानं घेतलेल्या गोडाऊनमध्ये पत्नीला घेऊन गेला. त्यानं पत्नीला चल तुला आपलं नवीन गोडाऊन दाखवतो असं सांगितलं होतं. त्यानंतर आत गेल्यानंतर त्यानं पत्नीचा गळा आवळून खून केला.

समीरनं आधीच तिथं एक लोखंड वितळवण्याची भट्टी तयार केली होती. त्यानं पत्नीचा मृतदेह त्या भट्टीत टाकला. त्यानंतर त्यानं पत्नीच्या मृतदेहाची राख ही जवळच्या नदीत टाकून दिली. हा सगळा कारभार त्यानं मुलं मूळ गावी दिवळीच्या सुट्टीला गेल्यानंतर केला होता.

...अन् पोलिसांना संशय आला

पत्नीचा खून केल्यानंतर समीरनं पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर तो सतत या केसबाबत काय झालं याचा फोलोअप घेण्यासाठी पोलीस ठाण्याच्या चकरा मारत होता. तो केसचं पुढं काय झालं पोलिसांना त्याच्या बेपत्ता पत्नीचा शोध लागला का याबाबत चौकशी करत होता. त्यानं पत्नीला मारणाऱ्याची शोधमोहीम कुठंपर्यंत आली आहे अशी देखील विचारणा केली. इथंच पोलिसांना समीरच्या वागण्यावर संशय आला.

दरम्यान, डीसीपी संभाजी कदम यांनी समीर जाधवची खोलाच जाऊन चौकशी केली. सीसीटीव्ही फुटेजचा तांत्रिक तपास केला. त्यानंतर त्यांना समीरच्या जबाबात आणि तांत्रिक पुराव्यात तफावत दिसून आली. त्यानंतर पोलिसांनी समीर जाधवची कसून चौकशी केली. अखेरीस समीरनं आपला गुन्हा कबूल केला. त्यानं आपण हा गुन्हा करण्यासाठी दृष्यम चित्रपटातून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं.

समीर जाधववर वारजे मालवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हे प्रकरण राजगड पोलीस ठाण्यातकडे पुढील तपासासाठी ट्रान्फर करण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT