

Crime News
हुगळी : आई-वडिलांच्या बाजूला झोपलेल्या अवघ्या चार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात शुक्रवारी रात्री घडली. गंभीर जखमी अवस्थेत आढळलेल्या या चिमुकलीवर रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे स्थानिक प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.
तारकेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात वास्तव्यास असलेल्या एका कुटुंबाची ४ वर्षांची मुलगी शुक्रवारी रात्री तिच्या आजी आणि पालकांसोबत मच्छरदाणीखाली झोपली होती. रात्रीच्या वेळी, नराधमांनी मच्छरदाणी कापून तिला पळवून नेले, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. शनिवारी पहाटे मुलगी बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाने तिचा शोध सुरू केला. दुपारी ती विवस्त्र आणि रक्ताने माखलेल्या अवस्थेत स्टेशनजवळच्या एका नाल्यापाशी आढळली. चिमुकलीच्या शरीरावर जखमा असून, तिच्या गालावर चावल्याच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. उपचारानंतरही तिच्या गुप्तांगातून रक्तस्राव सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पीडितेला तातडीने तारकेश्वर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली नाही. त्यानंतर कुटुंबीय पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, अधिकाऱ्यांनी त्यांना हाकलून दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी नंतर मुलीला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी परत रुग्णालयात आणले. या घटनेनंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी करत पोलीस आणि डॉक्टरांच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र आंदोलन केले.