Pune Drain Inspection Pudhari
पुणे

Pune Drain Cleaning Scam: पुण्यात पावसाळी वाहिन्यांच्या साफसफाईतील गैरप्रकार उघड; 50 टक्के कामांवर प्रश्नचिन्ह

कॅमेऱ्यांच्या तपासणीत अनेक वाहिन्यांमध्ये गाळ आणि कचरा कायम; ठेकेदारांना काळ्या यादीचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

पुणे: महापालिकेच्या पावसाळी पूर्वतयारीचे बोगस कामे तंत्रज्ञानामुळे उघड झाली आहे. पूर येणाऱ्या ठिकाणांच्या तब्बल ७०० पावसाळी वाहिन्यांची कॅमेऱ्यांच्या साह्याने तपासणी करण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या पावसाळी वाहिन्या आणि ड्रेनेजलाइन साफसफाईची कामे ५० टक्के बोगस असल्याचे यात उघडकीस आले. या ठेकेदारांची बैठकीत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर आणि प्रजित नायर यांनी बैठक थेट त्यांना येत्या १० दिवसांत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले. ही कामे पूर्ण न केल्यास थेट काळ्या यादीत टाकून गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

यंदाच्या पावसाळ्यापूर्वी शहरातील पावसाळी वाहिन्या, नाले आणि ड्रेनेजलाइनची साफसफाई वेळेत पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. या कामांसाठी मोठा निधी खर्च करण्यात आला. मात्र, प्रत्यक्ष पावसात अनेक रस्ते आणि चौक जलमय झाल्याने कामांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

महापालिकेने पावसाळी वाहिन्यांच्या चेंबरची कॅमेऱ्याद्वारे तपासणी केली असता अनेक ठिकाणी गाळ, कचरा आणि अडथळे अद्याप कायम असल्याचे आढळून आले. तपासण्यात आलेल्या सुमारे ७०० चेंबरपैकी अनेक ठिकाणी साफसफाई अपुरी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संबंधित ठेकेदारांनी प्रत्यक्ष काम कितपत केले, याबाबतही संशय व्यक्त केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिकेने संबंधित ठेकेदारांची तातडीची बैठक बोलावून त्यांना फैलावर घेतले. कामांमध्ये कोणतीही निष्काळजीपणा किंवा दर्जाहीनता सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी दोषी ठेकेदारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला. अशा ठेकेदारांना भविष्यातील कामांपासून दूर ठेवण्यासाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरात एकूण सुमारे ४९ हजार पावसाळी चेंबर असून, उर्वरित चेंबर आणि वाहिन्यांचीही टप्प्याटप्प्याने तपासणी केली जाणार आहे. पावसाच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या या त्रुटींमुळे जलनिस्सारण व्यवस्थेतील कामकाजाची सखोल चौकशी आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT