पुणे: शहरातील ओढे, नाले यांसारख्या नैसर्गिक जलप्रवाहांना अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, पावसाळ्यापूर्वी नाले आणि पावसाळी लाइन्सची साफसफाई युद्धपातळीवर करण्यात येणार आहे. यासोबतच धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे कामही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी अवघ्या तासाभरात झालेल्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते. विविध ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि जाहिरातींचे फलक कोसळल्याच्या घटना घडल्या. सिंहगड रस्त्यावर झाडाची फांदी पडून एका महिलेचा मृत्यू झाला. मान्सूनला अजून दोन महिन्यांचा कालावधी असतानाच घडलेल्या या घटनांनंतर महापालिका प्रशासन सतर्क झाले असून, महापौर नागपुरे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन उपाययोजनांचे निर्देश दिले.
या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी साचणाऱ्या 127 ‘क्रॉनिक स्पॉट्स’वर मोठ्या व्यासाच्या पावसाळी लाइन्स टाकण्याचे काम जूनपूर्वी पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शहरात सध्या अवघ्या 15 टक्के रस्त्यांवरच पावसाळी गटारे उपलब्ध असून, त्यांची क्षमता तासाला 50 ते 60 मि.मी. पावसाचे पाणी वाहून नेण्याची आहे. मात्र, अलिकडील ढगफुटीच्या घटनांचा विचार करता तासाभरात 100 मि.मी.पेक्षा अधिक पावसाचा सामना करण्यासाठी नव्या क्षमतेच्या वाहिन्यांची गरज भासू लागली आहे.
पावसाळ्यात झाडपडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक ठिकाणांवरील धोकादायक फांद्या छाटण्याचे काम हाती घेतले जाणार असून, यासाठी परवानगी प्रक्रिया 44 तासांत पूर्ण केली जाणार आहे. तसेच, शहरातील 227 पाणी साचणाऱ्या ठिकाणांपैकी 120 ठिकाणी मोठ्या व्यासाच्या लाइन्स टाकण्याचे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. याशिवाय धोकादायक होर्डिंग्ज आणि इमारती हटविण्याबरोबरच नाले व ओढ्यांच्या प्रवाहात अडथळा आणणारी अतिक्रमणे दूर करण्याची कारवाईही केली जाणार असल्याचे महापौर नागपुरे यांनी सांगितले.
23 गावांसाठी 2,200 कोटींचा आराखडा
समाविष्ट 23 गावांमध्ये पावसाळी गटारे उभारण्यासाठी सुमारे 2,200 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमावलीनुसार हा आराखडा तयार करण्यात आला असून, यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे, असे महापौर मंजूषा नागपुरे यांनी सांगितले. दरम्यान, भविष्यात रस्ते बांधताना पावसाळी गटारे, ड्रेनेजलाइन, पाणीपुरवठा लाइन आणि केबल डक्ट यांसारख्या सर्व सुविधा एकत्रितपणे उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.