Dowry death in Pune
पुणे: राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याने उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक येथे घडली.
तरुणीचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून भारती विद्यापीठ पोलिसांकडून पतीसह सासरकडील नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Latest Pune News)
स्नेहा विशाल झेंडगे (वय 27) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. याबाबत स्नेहा यांचे वडील कैलास मच्छिंद्र सावंत (वय 55, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी 2 मे 2024 रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी कंपनी चालविण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये आणण्याची मागणी केली.
पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावण्यात आला. पैशांसाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ, तसेच मारहाण केली होता. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात होता. छळ असह्य झाल्याने स्नेहाने शनिवारी (9 ऑगस्ट) रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली, असे स्नेहाचे वडील कैलास सावंत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.