

Pune Market Update Today
पुणे: राखीपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर शेतमालाची तोड कमी प्रमाणात झाल्याने रविवारी गुलटेकडी मार्केट यार्डतील तरकारी विभागात फ्लॉवर, गाजर व मटारची आवक घटली. त्यातुलनेत मागणी अधिक राहिल्याने रविवारी या फळभाज्यांच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली. तर, पावसाने उघडीप दिल्याने भुईमूग शेंगाच्या काढणीस सुरुवात होऊन आवक वाढली आहे. मात्र, यामध्ये दर्जाहीन शेंगा मोठ्या प्रमाणात असल्याने त्याचा भावात दहा टक्क्यांनी घसरण झाली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तरकारी विभागात राज्यासह परराज्यातून 90 ट्रकमधून शेतमाल विक्रीसाठी बाजारात दाखल झाला. गतआठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक स्थिर राहिली. बहुतांश फळभाज्यांची आवक जावक कायम राहिल्याने गत आठवड्यातील दर टिकून होते, अशी माहिती मार्केट यार्डमधील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली. (Latest Pune News)
परराज्यांतून झालेल्या आवकमध्ये कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश हिरवी मिरची 8 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून कोबी 4 ते 5 टेम्पो, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा 3 ते 4 टेम्पो, इंदोर येथून गाजर 9 ते 10 टेम्पो, कर्नाटक येथून पावटा 2 ते 3 टेम्पो, तामिळनाडू येथून तोतापुरी कैरी 1 टेम्पो, कर्नाटक येथून घेवडा 2 ते 3 टेम्पो, गुजरात येथून भुईमूग शेंग 2 टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूणाची सुमारे 10 ते 12 टेम्पो तर इंदौर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा 40 ते 45 टेम्पो इतकी आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकमध्ये सातारी आले सुमारे 400 ते 500 गोणी, भेंडी 6 ते 7 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार क्रेट, हिरवी मिरची 3 ते 4 टेम्पो, काकडी 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, कोबी 7 ते 8 टेम्पो, ढोबळी मिरची 8 ते 10 टेम्पो, शेवगा 2 ते 3 टेम्पो, भुईमुंग शेंग 100 ते 125 गोणी, मटार 300 ते 400 गोणी, तांबडा भोपळा 8 ते 10 टेम्पो तर कांद्याची सुमारे 30 ते 40 टेम्पो इतकी आवक झाली होती.
पावसाच्या सरींचा पालेभाज्यांना फटका; दरातील तेजी कायम
जिल्हासह पुणे विभागात अधूनमधून कोसळणार्या पावसाच्या सरींचा परिणाम भाज्यांच्या दर्जावर झाला आहे. आवकेपैकी 50 ते 60 माल खराब व दर्जाहिन आहे. ग्राहकांकडून मात्र, दर्जेदार मालाला मागणी आहे. आवकच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने घाऊक बाजारात कोथिंबीर, मेथी, कांदापात, पुदीना, पालकच्या भावात जुडीमागे दोन ते तीन रुपयांनी वाढ झाली आहे. तर, शेपू व चुकाच्या जुडीमागे एक ते दोन रुपयांनी घसरण झाली आहे.
उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापार्यांनी दिली. गुलटेकडी मार्केटयार्डातील घाऊक बाजारात रविवारी (दि. 10) कोथिंबिरीची सुमारे 1 लाख 25 हजार तर मेथीची 50 हजार जुडींची आवक झाली. गत आठवड्याच्या तुलनेत कोथिंबीरीची आवक स्थिर राहिली. तर, मेथीची आवक दहा हजार जुड्यांनी घटली. घाऊक बाजारात एका जुडीला 3 ते 15 रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात 10 ते 25 रुपयांना एक या दराने पालेभाजीची विक्री सुरू आहे.