Stray Dog Pudhari
पुणे

Pune Dog Park: भटक्या श्वानांचा प्रश्न कायम; पुण्यात ‘डॉग पार्क’ योजनेवरून वाद

लसीकरण अपूर्ण असताना पाळीव कुत्र्यांसाठी 13 कोटींची तरतूद; नागरिकांकडून प्रश्नचिन्ह

पुढारी वृत्तसेवा

प्रज्ञा केळकर-सिंग

शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांमध्ये श्वानांची दहशत असताना महापालिकेचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. त्यातच आता पाळीव श्वानांसाठी महापालिकेने ‌‘डॉग पार्क‌’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. भटक्या श्वानांच्या लसीकरणाची मोहीम अपूर्ण असताना, पाळीव श्वानांसाठी मात्र ‌‘डॉग पार्क‌’च्या माध्यमातून चंगळ होणार असल्याचा विरोधाभास पाहायला मिळत आहे.

सुरुवातीला कात्रज येथील प्राणिसंग््राहालयाजवळ ‌‘डॉग पार्क‌’साठी जागा निश्चित करण्यात आली होती. केंद्रीय प्राणिसंग््राहालय प्राधिकरणाने महापालिकेला कात्रज प्राणिसंग््राहालयाजवळ तसेच बाणेर येथे ‌‘डॉग पार्क‌’ उभारण्यासाठी परवानगी नाकारली. त्यामुळे आता महापालिकेच्या आरोग्य विभागाने खराडीमध्ये ‌‘डॉग पार्क‌’ उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. हैदराबादच्या धर्तीवर स्वतंत्र ‌‘डॉग पार्क‌’ उभारण्याचा महापालिकेचा मानस आहे.

अद्ययावत आणि सुसज्ज ‌‘डॉग पार्क‌’ उभारण्यासाठी महापालिकेच्या अंदाजपत्रकावर 13 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दुसरीकडे, मायक्रोचिपसाठी 50-55 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हाच निधी गाड्यांची संख्या आणि मनुष्यबळ वाढवणे, लसीकरणाची मोहीम जलद गतीने पूर्ण करणे, यासाठी वापरल्यास रेबीजमुक्त पुण्याचे उद्दिष्ट साध्य करणे शक्य होणार आहे.

‌‘डॉग पार्क‌’मध्ये काय असणार?

डॉग पार्कमध्ये जॉगिंग ट्रॅक, श्वानांना खेळण्याची जागा, स्विमिंग पूल आणि पार्किंगची सुविधा देण्याचा मानस आहे. कुत्र्यांसाठी फिरण्याची सोय, खेळणी, दवाखाना, डॉग पाँड अशा सुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सध्या महापालिका हद्दीत 8000 नोंदणीकृत पाळीव कुत्री आहेत.

अनेकांसाठी श्वान हा केवळ पाळीव प्राणी नसून एक साथीदार, मित्र, कुटुंबातील सदस्य असतो. त्यामुळे ‌‘डॉग पार्क‌’सारख्या सुविधांची गरज आहे. यासाठी प्रस्ताव दिला आहे. देशातील काही शहरांमध्ये अशी उद्याने आधीपासूनच अस्तित्वात आहेत. त्याच धर्तीवर पुण्यात ‌‘डॉग पार्क‌’ सुरू करण्याचा मानस आहे.
डॉ. सारिका फुंडे-भोसले, पशुवैद्यकीय अधिकारी, पुणे महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT