पुणे

राजगुरूनगर : उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याच्या आरोपातून डॉक्टरला गंभीर मारहाण

अमृता चौगुले

राजगुरूनगर (जि.पुणे), पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्‍हातील चांडोली (ता. खेड) येथील खासगी रुग्णालयात २८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डॉक्टरानी उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यानंतर डॉक्टरला नातेवाईकांनी गंभीर मारहाण केली. आणि रुग्णालयाच्या काचा ही फोडल्या. पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या राजगुरूनगर लगतच्या चांडोली येथील एका रुग्णालयात बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील कडुसच्या तुरुकवाडी येथील निलोफर शमसुद्दीन मोमीन या विवाहितेने घरगुती कारणावरून ४ दिवसांपूर्वी वीष प्राशन केले होते. तिला उपचारासाठी चांडोली फाटा येथे जीवनरक्षा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारी दुपारी उपचारादरम्‍यान या महिलेचा मृत्यू झाला. आमचा रुग्ण दगावला कसा ? अशी विचारणा करत नातेवाईकांनी संतप्त होऊन डॉ. रमेश शेजुळ (रा. राक्षेवाडी, ता. खेड) यांना डोक्याला सॅनिटायझरच्या लोखंडी स्टँडने मारहाण केली, तसेच हॉस्पिटलच्या काचा फोडल्या. या मारहाणीत डॉ. शेजुळ गंभीर जखमी झाले, त्यांना उपचारासाठी चाकण येथे दाखल केले आहे.

पोलीस निरीक्षक सतीश गुरव, पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार संतोष घोलप, संदिप भापकर, नवनाथ थिटे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमलेल्या जमाव व नातेवाईकांना शांत केले. याबाबत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल करणार

उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पतीने रूग्‍णालयाची एक काच फोडली. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ सर्वांना बाहेर काढले. मयताजवळ पती उपस्थित होते. त्‍याने तेथील वस्तू घेऊन डॉक्टरांना मारहाण केली. यामध्ये डॉक्‍टरांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे.

हेही वाचा  

SCROLL FOR NEXT