वाशिम : मालेगाव येथे भीषण आगीत ३ घरे जळून खाक | पुढारी

वाशिम : मालेगाव येथे भीषण आगीत ३ घरे जळून खाक

वाशिम : पुढारी वृत्तसेवा : मालेगाव शहरातील गांधीनगर परिसरातील महमूदिया कॉलनीमध्ये आज ( बुधवारी) दुपारी लागलेल्या भीषण आगीत ३ घरे जळून खाक झाली. या दुर्घटनेत ३ गरीब कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे.

मालेगांव शहरातील गांधीनगर परिसरातील महमूदिया कॉलनी येथील अताउल्ला खान हिदायत खान यांच्या घराला आज दुपारी १२ च्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने क्षणातच रौद्र रूप धारण करून शेजारच्या सलीम खान शेरखान खान व शाहिदा बी नूर खान यांच्या घरांना कवेत घेतले. तर सलीम खान याच्या घरातील गॅस सिलिंडरचा आगीमुळे स्फोट झाला. यावेळी तिन्ही घरातील पत्रे हवेत उडाली.

वाशिम नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत तीनही घरे जळून खाक झाली होती. तीनही कुटुंब मजुरी करून आपला चरितार्थ चालवितात. या आगीत अपंग असलेल्या अताउल्ला खानचे जवळपास २ लाख रूपयांचे, तर शाहिदा बी नूर खान यांचे १ लाख ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याचप्रमाणे सलीम खान शेरखान यांनी मंगळवारी रात्री फुटलेल्या भिशीची रोख रक्कमही या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे त्यांचे जवळपास २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऐन रमजान सणात मुस्लिम परिवारांवर अग्नी तांडवामुळे आर्थिक संकट कोसळले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button