पुणे: डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला पुणेकरांचा वाढता विरोध आणि पोलिसांनी घालून दिलेली 'चार बेस, चार टॉप'ची मर्यादा असतानाही उपनगरांसह शहरात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्या मंडळांवर अखेर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ध्वनीची निर्धारित पातळी ओलांडणाऱ्या शहरातील ११६ मंडळांवर खटले भरण्यात आले आहे. कारवाईदरम्यान चार प्लाझ्मा, चार प्रेशर मिडसह सहा ध्वनियंत्रणा जप्त करण्यात आल्या आहेत.
एकीकडे काही मंडळांनी डीजे नको, अशी भूमिका घेतली असली तरी शहराचा मध्यवर्ती भाग समजल्या जाणाऱ्या परिमंडळ १ च्या हद्दीत सर्वाधिक म्हणजे ५५ मंडळावर खटले भरण्यात आले आहे. त्यामुळे शहरातच आवाजाची पातळी वाढल्याचे अधोरेखित झाले आहे. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल १ हजार १०० मंडळांच्या ध्वनीचे 'रीडिंग' घेतले होते.
या वेळी ध्वनीची तीव्रता किती होती याची नोंद करण्यात आली. या नोंदींचे परीक्षण करून निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यानुसार १,१०० मंडळांच्या ध्वनीच्या 'रीडिंग'चे परीक्षण करून नियमभंग करणाऱ्या मंडळांची छाननी करण्यात आली. त्यानंतर हा कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
दहीहंडी उत्सव हा गणेशोत्सवापूर्वीची 'रंगीत तालीम' मानली जात होती. पोलिसांनी दहीहंडीपूर्वीच डीजे आणि ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार चार बेस आणि चार टॉपची मर्यादा घातली होती. मात्र, काही भागांत चार बेस, चार टॉपची संख्या मर्यादित असली, तरी आवाज कर्णकर्कश पातळीवर पोहोचल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
केवळ ध्वनियंत्रणांची संख्या मर्यादित ठेवणे पुरेसे नसून, निर्धारित डेसिबल पातळीचेही पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे चार बेस आणि चार टॉपची मर्यादा पाळूनही ध्वनीची निर्धारित पातळी ओलांडणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल केले आहेत. अधिक क्षमतेची ध्वनिव्यवस्था वापरणाऱ्या मंडळांवरही पोलिसांनी तत्काळ कारवाई करून ध्वनियंत्रणा जप्त केल्या.
परिमंडळनिहाय मंडळांवर भरले गेलेले खटले
परिमंडळनिहाय कारवाईत परिमंडळ एकमध्ये सर्वाधिक ५५ खटले, परिमंडळ दोनमध्ये २३, परिमंडळ तीनमध्ये १०, परिमंडळ सहामध्ये २७ गुन्हे, तर परिमंडळ ७ मध्ये १ खटले भरले आहेत. परिमंडळ चार आणि पाचमध्ये एकही खटला दाखल करण्यात आलेला नाही. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहीहंडीतील कारवाईतून पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिसांच्या आदेशाची अमंलबजावणी न केल्याने बीएनएसनुसार १० गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे आगामी गणेशोत्सवातही ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या मंडळांवर पोलिसांची नजर राहणार आहे.