

पुणे: पावसाळा सुरू होताच शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, डेंग्यूच्या संशयित रुग्णांनी बाराशेचा टप्पा ओलांडला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ७ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, शहरात तब्बल १ हजार २६६ संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४७ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, चिकुनगुनियाचेही २१ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, वर्षभरातील संशयित रुग्णांपैकी तब्बल ८६ टक्के रुग्ण जूननंतर आढळल्याने पावसाळ्यातील डासोत्पत्तीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
जानेवारी ते मे या पाच महिन्यांत डेंग्यूचे १७३ संशयित रुग्ण होते. मात्र, जूनपासून रुग्णसंख्येने वेग घेतला. जूनमध्ये १७५, जुलैमध्ये ३२३ आणि ऑगस्टमध्ये तब्बल ४८४ संशयित रुग्ण आढळले. सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांतच आणखी १११ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. जुलैच्या तुलनेत ऑगस्टमधील संशयित रुग्णसंख्या जवळपास ५० टक्क्यांनी वाढली आहे. डेंग्यूच्या निश्चित रुग्णांमध्येही ऑगस्टमध्ये सर्वाधिक २१ रुग्ण आढळले. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी १२, तर एप्रिलमध्ये दोन रुग्णांची नोंद झाली. जानेवारी ते मार्च आणि मेमध्ये एकही निश्चित रुग्ण आढळला नाही. दिलासादायक बाब म्हणजे, डेंग्यूमुळे अद्याप एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. चिकुनगुनियाचे ऑगस्टमध्ये सर्वाधिक १४ रुग्ण आढळले. जूनमध्ये सहा, तर जुलैमध्ये एका रुग्णाची नोंद झाली आहे.
डासोत्पत्तीच्या २,२३१ ठिकाणी कारवाई
महापालिकेच्या कीटक नियंत्रण विभागाने घरे, कार्यालये, महाविद्यालये आणि विविध आस्थापनांची तपासणी केली. या पाहणीत २ हजार २३१ ठिकाणी डासांच्या अळ्या अथवा डासोत्पत्तीची ठिकाणे आढळली. त्यामुळे संबंधितांना नोटिसा बजावून ४ लाख ४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. ऑगस्टमध्ये ५२३ ठिकाणी डासोत्पत्ती आढळल्याने १ लाख ३९ हजार रुपयांचा, तर जुलैमध्ये ५२४ ठिकाणी डासोत्पत्ती आढळून आल्याने १ लाख २२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील रणगाड्यात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या!
पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरात मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या अळ्या आढळल्याने खळबळ उडाली होती. या परिसरातील अस्वच्छ ठिकाणे, साचलेले पाणी, व्हीआयपी बंगल्यांसह एका शाळेतील रणगाड्यातही डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या. या प्रकारानंतर महापालिकेने हद्दीचा विचार न करता नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत तातडीने औषध व धूर फवारणी केली. त्यामुळे डासांच्या आळ्या नष्ट करण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.
१५ आरोग्य कोठ्यांमध्ये ४० कामगार
डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेने कंत्राटी मनुष्यबळाची मदत घेतली आहे. १५ आरोग्य कोठ्यांमध्ये प्रत्येकी ४० कामगार नेमण्यात आले असून, त्यांना वाहनेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. धूर फवारणी तसेच औषधांचा पुरवठा करण्यात येत आहे.
शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. ताप किंवा अन्य लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत तसेच अल्प दरात उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
डॉ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका