DJ Free Ganeshotsav Pudhari
पुणे

Pune DJ Free Ganeshotsav: सोलापूरच्या धर्तीवर पुण्यातही ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव करा; सर्वपक्षीय नेत्यांना साद

नागरिकांच्या आरोग्याचा आणि वाहतुकीचा विचार करून उत्सवाच्या स्वरूपात बदलाची गरज; ढोल-ताशांनाही मर्यादा आणि विश्रांतीचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

पुणे: सोलापूरमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत ध्वनियंत्रणा (डीजे) मुक्त गणेशोत्सवाचा निर्णय प्रत्यक्षात आणला; त्याच धर्तीवर पुण्यातही राजकीय इच्छाशक्ती दाखविल्यास ध्वनियंत्रणामुक्त गणेशोत्सव साजरा करणे शक्य आहे. ध्वनियंत्रणा हा गणेशोत्सवाच्या परंपरेचा भाग नाही आणि असूही शकत नाही. प्रत्येक नागरिकाला शांततेने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला असून, तो कोणालाही हिरावून घेता येणार नाही. त्यामुळे शहरातील सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेऊन यंदाचा गणेशोत्सव ध्वनियंत्रणामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा निसर्गसेवक संस्थेचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे.

गणेशोत्सवाचा उत्साह आणि चैतन्य कायम ठेवतानाच बदलत्या काळानुसार ध्वनिप्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून उत्सवाच्या स्वरूपात सकारात्मक बदल करण्याची गरज असल्याचे वेलणकर यांनी म्हटले आहे. ध्वनियंत्रणेच्या कर्णकर्कश आवाजावर नियंत्रण आणण्याबरोबरच ढोल-ताशा पथकांच्या वादनालाही योग्य मर्यादा असावी तसेच रस्त्यांवरील मंडपांमधील अंतर वाढवून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी लोकप्रतिनिधींनी मंडळांचे प्रबोधन करावे. लोकमान्य टिळकांनी तत्कालीन काळाची गरज ओळखून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.

मात्र, आज पुण्याची लोकसंख्या आणि वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पर्यावरणाचा समतोलही ढासळत आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून सार्वजनिक उत्सवांमध्ये बदल स्वीकारणे आवश्यक आहे. विशेषतः ध्वनियंत्रणेच्या प्रचंड आवाजाचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मोठ्या आवाजामुळे श्रवणदोष, हृदयाची धडधड वाढणे, रक्तदाब, चिडचिड आणि ताण यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुलेही मोठ्या क्षमतेच्या स्पीकरसमोर नाचताना दिसतात.

त्यामुळे कायद्याने निश्चित केलेल्या ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी राजकीय नेत्यांनी आपापल्या भागातील गणेश मंडळांशी संवाद साधून त्यांचे प्रबोधन करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून विविध ध्वनियंत्रणांची प्रत्यक्ष चाचणी घेऊन डेसिबलपातळी तसेच कर्णकर्कश आवाज निर्माण करणाऱ्या उपकरणांचा अभ्यास सुरू आहे. प्रशासनाच्या या प्रयत्नांना राजकीय नेत्यांची साथ मिळाल्यास ध्वनियंत्रणेच्या दणदणाटाला आळा बसू शकतो. सोलापूरप्रमाणे पुण्यातही सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित भूमिका घेतल्यास डीजेमुक्त, पर्यावरणपूरक आणि नागरिकांच्या आरोग्याचा विचार करणारा गणेशोत्सव साजरा करणे शक्य असल्याचे वेलणकर यांनी नमूद केले.

ढोल-ताशांच्या वादनातही विश्रांती हवी

पुण्याच्या गणेशोत्सवाची ओळख असलेल्या पारंपरिक ढोल-ताशा हा उत्साह निर्माण करणारा पारंपरिक वाद्यमेळ असला, तरी वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याबरोबरच वादक आणि नागरिकांच्या कानांच्या आरोग्याचा विचार होणे आवश्यक आहे. त्यासाठी तासभराच्या वादनानंतर किमान २० मिनिटांची विश्रांती देण्याची गरज आहे.

जवळजवळच्या छोट्या मंडळांना एकत्र आणा

रस्त्यांवरील दोन मंडळांमधील अंतर कमी असल्यास वाहतूक कोंडी वाढते. वाहनचालकांना वारंवार ब्रेक, गिअर आणि क्लचचा वापर करावा लागतो. त्यातून हॉर्नचा आवाज तसेच वाहनांच्या धुराचे प्रदूषण वाढते. त्यामुळे जवळजवळ असलेल्या छोट्या मंडळांना सामाजिक हिताच्या दृष्टीने एकत्र आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. मंडळांची संख्या कमी करून त्यांच्यातील अंतर वाढविल्यास वाहतुकीवरील ताण कमी होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT