पुणे: सोलापूरने डीजेमुक्त उत्सव करून दाखवला आहे; मग पुणे का करू शकत नाही? असा सवाल 'पुढारी'च्या जागरूक वाचकांकडून करण्यात आला. सार्वजनिक उत्सवांमधील कर्णकर्कश डीजे, डॉल्बी आणि ध्वनिप्रदूषणाच्या त्रासाबाबत दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या विशेष वृत्तांकन पानाला पुणेकर वाचकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
डीजे आणि लेझरच्या अतिरेकामुळे गणेशोत्सवाचे मूळ धार्मिक आणि सामाजिक स्वरूप बिघडत असून, याविरोधात आता नागरिकांनीच एकत्र येऊन आवाज उठवण्याची गरज वाचकांनी व्यक्त केली आहे. दैनिक ‘पुढारी’त प्रसिद्ध झालेल्या बातमीवर शहर आणि उपनगरांतील नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या.
मी स्वतः गेली ४५ वर्षे गणेशोत्सवात सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम केले आहे. पण आता डीजेचा जो अतिरेक चालू आहे, त्याला कंटाळून गेली दोन वर्षे मी या उत्सवातून बाहेर पडलो आहे. काल महापालिकेत डीजे संदर्भात बोलणाऱ्या एका व्यक्तीला सभागृहातून हाकलण्यात आले, याबद्दल खंत वाटते. आपण सर्वांनी एकत्र येऊन याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.प्रवीण वडके
डीजे आणि ढोल-ताशांच्या आवाजाने वैतागलेले मध्यवर्ती पुण्यातील अनेक वृद्ध लोक उत्सवाच्या १० दिवसांत शहराबाहेर किंवा आश्रमात राहण्यास जात आहेत. आता तर कात्रज, आंबेगाव, वडगाव अशा उपनगरांमध्येही संध्याकाळी ढोल सरावाचे आवाज येऊ लागले आहेत.माधव गोडबोले
गणेशोत्सवच काय, तर इतर सर्व उत्सवांना आणि मिरवणुकांना देखील ही बंधने लागलीच पाहिजेत.मीनाक्षी नवले
कर्णकर्कश आणि आरोग्यविघातक ध्वनिक्षेपक लावून उत्सव साजरा करू इच्छिणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे. हे उत्सव नक्की कोण कोणासाठी घडवून आणते आणि यात नुकसान कोणाचे होते, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.प्रदीप माळी
मोठे कर्णकर्कश स्पीकर आणि हिडीस नृत्याविष्कार याने धार्मिक आणि सामाजिक महत्त्व कमी होऊन हिंदू धर्माची विटंबना होत आहे. सोलापूरच्या धर्तीवर पुण्यातही पूर्णपणे डीजेमुक्त गणेशोत्सव झाला पाहिजे.प्रदीप हलसगीकर
सत्ताधीशच यांच्या पाठीशी उभे आहेत आणि गृहमंत्री त्यांना पाठिंबा देत आहेत. पोलिसच जागा सोडायला तयार असतील तर सामान्य जनतेचा आवाज कोण ऐकणार?सुरेश मोहिते
सार्वजनिक उत्सव आता कालबाह्य झाला असून, ही मूठभर लोकांची विकृत हौस उरली आहे. यात भक्ती उरलेली नाही, त्यामुळे लोकांनीच अशा सार्वजनिक दर्शनाला जाणे बंद केले पाहिजे.सुबराव पाटील
सण-उत्सवांमधील डीजेचा गोंगाट आणि ढोल-ताशा पथकांच्या महिनोन्महिने चालणाऱ्या अनधिकृत सरावामुळे पुण्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्रदूषणामुळे वृद्ध, रुग्ण व लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूरच्या धर्तीवर पुण्यातही ‘’डीजेमुक्त उत्सव’’ ही संकल्पना राबवून पोलिसांनी अशा ध्वनिप्रदूषणावर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करावी. डीजेमुक्त गणेशोत्सवासंदर्भात आम्ही पुणे पोलिस आयुक्तांना नुकतेच पत्र दिले आहे.राज सिंग
गणेशोत्सवात डीजेचा कर्णकर्कश आवाज, अश्लील गाणी आणि हिडीस नृत्यामुळे उत्सवाचे पावित्र्य नष्ट होऊन विटंबना होत आहे. रुग्ण, वृद्ध व महिलांना याचा प्रचंड त्रास होतोय. अशा वेळी हिंदुत्ववादी संघटना व राजकीय नेते गप्प का? पुढील पिढी वाचवण्यासाठी डीजे ऐवजी पारंपरिक वाद्ये आणि मंगलमयी वातावरणातच उत्सव साजरा झाला पाहिजे.प्रसाद पाठक
सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये कर्णकर्कश डीजे आणि लेझर लाईटवर पूर्ण बंदी असायला हवी. लोकानुनय करताना वृद्ध, रुग्ण आणि लहान मुलांचा विचार करणे गरजेचे आहे. सर्वधर्मीय उत्सवांना समान नियम हवेत. पोलिस आयुक्तांच्या बंदीच्या निर्णयाचे स्वागत असून, गणेशोत्सव दणक्यात पण गैरप्रकारमुक्त साजरा व्हावा, यासाठी विवेकाची कास धरणे आवश्यक आहे.संदीप खर्डेकर