पुणे: दिवाळीच्या सुटीत हजारो नागरिक मूळ गावी गेल्याने पुण्यातील गजबजलेले रस्ते मोकळे झाले आणि वाहतूक कोंडीही कमी झाली. मात्र, शहरातून मोठ्या संख्येने नागरिक बाहेर पडूनही पुण्याच्या पाण्याच्या वापरात अपेक्षित घट झालेली नाही. दिवाळीच्या कालावधीत पाणी वापरात केवळ २० ते २५ एमएलडीची घट झाल्याचे महापालिका प्रशासनाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
नोकरी, शिक्षण, व्यवसाय आणि अन्य कारणांसाठी राज्यासह देशाच्या विविध भागांतून नागरिक पुण्यात स्थायिक होत आहेत. वाढत्या लोकसंख्येमुळे शहराचा विस्तार झपाट्याने झाला असून, विस्ताराच्या दृष्टीने पुणे महापालिका राज्यातील सर्वांत मोठ्या महापालिकांपैकी एक ठरली आहे. परिणामी, शहराची पाण्याची मागणी आणि प्रत्यक्ष वापरही वाढत आहे.
शहरात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याने पाण्याची गरज वाढत असल्याचा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. या पार्श्वभूमीवर शहराचा पाण्याचा कोटा वाढवून देण्याची मागणी महापालिकेकडून राज्य सरकार आणि पाटबंधारे विभागाकडे सातत्याने केली जात आहे. दरम्यान, पुण्यात स्थायिक झालेले अनेक नागरिक दरवर्षी दिवाळी सणासाठी मूळ गावी जातात. त्यामुळे शहरातील वाहतूक कमी होऊन रस्ते मोकळे होतात. यंदाही दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात नागरिक शहराबाहेर गेले. मात्र, नागरिकांची संख्या कमी होऊनही पाणी वापरात फारसा फरक पडलेला नाही.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या काळात पाण्याचा वापर केवळ २० ते २५ एमएलडीने कमी झाला. मात्र, या घटीनंतर पाणीपुरवठ्याचा दाब वाढल्याने कमी दाबाने पाणी येणे आणि पाणीटंचाईच्या तक्रारींमध्ये मोठी घट झाली आहे. अनेक भागांतील तक्रारी जवळपास थांबल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या भागांमध्ये पाणी पोहचत नव्हते, तेथेही या कालावधीत पाणी पोहचल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेने कोणत्या दिवशी किती पाणी उचलले?
दिवाळीचा पहिला दिवस ५ नोव्हेंबर रोजी होता. त्या दिवशी महापालिकेने १,७१८ एमएलडी पाणी उचलले. दुसऱ्या दिवशी धनत्रयोदशीला १,७०० एमएलडी पाणी उचलण्यात आले. त्यानंतर ७ नोव्हेंबरपासून अनुक्रमे १,६८८ एमएलडी, १,६८२ एमएलडी, १,६९८ एमएलडी, १,६९७ एमएलडी आणि १,६९२ एमएलडी पाणी उचलण्यात आले आहे.