पुणे: लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांच्या आतषबाजीचा आनंद साजरा होत असताना दुसरीकडे पुणे शहरात ठिकठिकाणी आगीच्या घटना घडल्या. फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे झाडे, गवत, घरांच्या गॅलऱ्या, दुकाने, गोडाऊन तसेच वाहनांनी पेट घेतला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७ या कालावधीत अग्निशमन दलाकडे आगीच्या तब्बल ९४ वर्दी नोंदविण्यात आल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर धावपळ करीत आगींवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.
शहराच्या मध्यवर्ती भागापासून उपनगरांपर्यंत आगीच्या घटनांची मालिका सुरू होती. मोकळ्या जागेतील गवत आणि झाडांना फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे आग लागण्याचे प्रमाण अधिक होते. याशिवाय सदाशिव पेठेतील नागनाथ पार, सिंहगड रस्त्यावरील गोयल गंगा परिसर, खराडी, गंज पेठ, शुक्रवार पेठ, पाषाण आणि बाणेर येथे घरांच्या गॅलरी, फ्लॅट तसेच ताडपत्रीने पेट घेतला.
व्यावसायिक आस्थापनांनाही आगीची झळ बसली. सातारा रस्त्यावरील सोनावणे इंडस्ट्रीजमधील दुकान, मंगळवार पेठेतील वजनकाटा दुकान, दगडूशेठ मंदिरासमोरील दुकान, वारजे कॅनॉल रस्त्यावरील गोडाऊन आणि फुरसुंगी येथील गोडाऊनला आग लागली. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग आणि धायरीतील रायकर मळा येथे वाहनांनी पेट घेतला. औंध गावात इलेक्ट्रिक डीपीला आग लागल्याची घटनाही घडली.
मध्यरात्री अनेक ठिकाणांहून कॉल
दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी कोंढव्यातील कडनगर येथील पडीक इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग लागल्याची पहिली वर्दी अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आगीच्या घटनांचे सत्र सुरूच होते. रात्री ७ वाजून २३ मिनिटांनी सदाशिव पेठेतील नागनाथ पार येथे गॅलरीला, तर रात्री ८ वाजून ४२ मिनिटांनी खराडीतील मुंढवा पुलापुढे एका फ्लॅटला आग लागली. रात्री ९ वाजून ३७ मिनिटांनी दगडूशेठ मंदिरासमोरील समाधान चौकातील दुकानाला आग लागल्याची वर्दी मिळाली.
रात्री १० वाजून ४६ मिनिटांनी कात्रज-आंबेगाव परिसरातील गोडाऊनला आग लागली. पहाटे २ वाजून ४९ मिनिटांनी माणिकबाग येथे दुकानाला आग लागली. तर सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी नाना पेठेतील किराड हॉस्पिटलजवळ उसाच्या गुर्हाळाला आग लागल्याची घटना घडली. सकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी गुजरवाडी येथील कंपनीतील आगीची वर्दी मिळाली.
एकाच वेळी अनेक ठिकाणांहून आगीचे कॉल येत असल्याने अग्निशमन दलाच्या विविध केंद्रांतील जवानांना रात्रभर सतर्क राहावे लागले. जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. नागरिकांनी फटाके फोडताना बाल्कनी, टेरेस आणि ज्वलनशील वस्तूंपासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन अग्निशमन दलाने केले आहे.
सिटीप्राईडजवळ फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला आग
सातारा रस्त्यावरील सिटीप्राईड चित्रपटगृहाजवळ सोनावणे इंडस्ट्रीज येथील फ्लेक्स प्रिंटिंग दुकानाला रात्री नऊच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या आणि एक टँकर घटनास्थळी दाखल झाले. जवानांकडून ही आग विझविण्यात आली.