Diwali Diyas Shopping Pudhari
पुणे

Pune Diwali Diyas: पुण्यात दिवाळीच्या पणत्यांची बाजारपेठ सजली; कमळ, मोर, वृंदावनासह वॉल हॅगिंग दिव्यांना पसंती

कसबा पेठेतील कुंभारवाड्यात विविध आकारांच्या पणत्यांची रेलचेल; दरात १० ते २० टक्के वाढ, तरी खरेदीचा उत्साह कायम

पुढारी वृत्तसेवा

पुणे: तुळशी वृंदावन, घर, कमळ, मोर, फुले तसेच काल्पनिक मंदिरांच्या आकारांतील दिवे... विविध रंगसंगती आणि नक्षीकाम केलेल्या पणत्या...मातीचे वॉल हॅगिंग दिवे अन्‌ २१ दिव्यांची समई... अशा वैविध्यपूर्ण पणत्या-दिव्यांनी कसबा पेठेतील कुंभारवाडा सजला आहे. दिवाळीच्या प्रकाशोत्सवासाठी बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह पाहायला मिळत असून, पारंपरिक पणत्यांसोबतच रंगबिरंगी, नक्षीकाम केलेल्या आणि मोत्यांनी सजविलेल्या पणत्या लक्ष वेधून घेत आहेत.

यंदा घर, कमळ, मोर, शंख, नारळ, वृंदावन, जुनावाडा, काल्पनिक मंदिरे, अशा विविध आकारांतील दिव्यांना पसंती मिळत आहे. तर घराच्या सजावटीत वेगळेपणा आणणाऱ्या मातीच्या वॉल हॅगिंग दिव्यांचा यंदा विशेष ट्रेंड पाहायला मिळत आहे. पाच ते सात पणत्यांचे आकर्षक सेट, मोठ्या आकारातील समईही पसंतीस उतरत आहे. पणत्या आणि दिव्यांच्या किमतीत १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी खरेदीचा उत्साह कायम आहे.

प्रकाशाचा सण म्हणजे दिवाळी. दिवे-पणत्यांच्या प्रकाशात सगळे वातावरणच उजळते अन्‌ सगळीकडे आनंदी आनंद पसरतो. दिवाळीच्या तयारीत पणत्या आणि दिव्यांच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. यंदाही कसबा पेठेतील आणि मुंढवा येथील कुंभारवाड्यात पणत्या - दिव्यांचे विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

घर, कमळ, नारळ आणि वृंदावन अशा विविध आकारांतील दिव्यांसह २१ दिव्यांच्या समईला चांगला प्रतिसाद मिळत आहे. साध्या पणत्यांपासून रंगीत आणि नक्षीकाम केलेल्या पणत्यांपर्यंत अनेक प्रकार उपलब्ध आहेत. दिवाळी जसजशी जवळ येईल, तसतशी मागणी आणखी वाढेल, अशी अपेक्षा आहे.
प्रियंका तिकोने, व्यावसायिक
यंदा कच्च्या मालाच्या किमती आणि वाहतूक खर्च वाढल्याने पणत्या-दिव्यांच्या किमतीत वाढ झाली आहे. पण, खरेदीसाठी नागरिक गुजरात आणि राजस्थान येथून आलेल्या पणत्या-दिव्यांची विक्री होत आहे. घराच्या सजावटीसाठी वॉल हॅगिंग दिव्यांना विशेष पसंती मिळत असून, पाच ते सात पणत्यांचे आकर्षक सेटही खरेदी करण्यात येत आहेत.
सारिका कुंभार, व्यावसायिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT